आमदार रविशेठ पाटील यांची मागणी
पेण ः प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम विविध स्तरावर होत असून यामुळे बळीराजाही हतबल झाला आहे. रब्बी हंगामातील भाजीपाला आणि इतर पिकांची संचारबंदीमुळे पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असून बळीराजाला बळ देण्यासाठी खरीप हंगामातील बियाणे, खते व औषधांचा मोफत पुरवठा करावा, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. रायगड जिल्ह्यातील शहरी भागात कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत असून, मुंबईलगत असल्याने हे संकट रायगडातील ग्रामीण भागातही घोंघावत आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे भातशेती आणि भाजीपाल्याची दयनीय स्थिती झाली असून, शेतकर्यांकडे खरीप हंगामाच्या पेरणीसाठीही बियाणे नाहीत. त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात खतांचा साठाही उपलब्ध नाही. त्या अनुषंगाने या परिस्थितीचा सर्वंकष विचार करून रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांना 100 टक्के सबसिडी देऊन शेतीच्या कामांसाठी रक्कमही उपलब्ध करून द्यावी, तरच शेतकरी या महाभयंकर संकटापासून वाचू शकेल, असेही आमदार रविशेठ पाटील यांनी स्पष्ट केले आहे.