Breaking News

तार्‍यांचे जाणे…

गेला महिनाभराहून अधिक काळ लॉकडाऊनमुळे घरात अडकून बसलेले आणि कोरोनाखेरीज डोक्याला दुसरा विचार नसलेले तमाम भारतीय गेले दोन दिवस मात्र इरफान खान आणि ऋषी कपूर या दोघा मातब्बर कलाकारांच्या अकस्मात जाण्याने हेलावून गेले आहेत. या दोघांनी मात्र जाता जाता आपल्याला जगण्याकडे पाहण्याची मोलाची दृष्टी दिली आहे. खरंतर गेला महिनाभर अवतीभवती सतत कोरोनाची बाधा, रुग्णांची संख्या, मृतांचे आकडे हे आणि हेच आहे. अमेरिका, स्पेन, इटली या देशांमधील परिस्थिती तर भयावहच आहे. तुलनेने आपल्या देशातील अद्याप तरी नियंत्रित दिसणारी आकडेवारी एकीकडे दिलासादायक वाटत असली तरी दिवसागणिक त्यात पडणारी भर चिंताक्रांतही करते. अशा गुंतागुंतीच्या मन:स्थितीतून लोक जात असताना बुधवारी बातमी आली, इरफान खान या प्रतिभावान अभिनेत्याच्या निधनाची. गेली दोन वर्षे तो कॅन्सरशी झुंज देत असल्याचे चाहत्यांना ज्ञात होतेच, पण ब्रिटनमध्ये कॅन्सरचे उपचार घेऊन तो गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर आता हा बरा होईल अशी आशा वाटली होती, पण चारच दिवसांपूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे वृत्त आले आणि पाठोपाठ त्याची आई गेल्याची बातमीही, मात्र त्याच्यासंदर्भातही लगेचच अशी काही वाईट बातमी येईल असे कुणालाच वाटले नव्हते. वेगळ्या धाटणीच्या सिनेमांतून सहजसुंदर अभिनयाने इरफानने अनेकांची मने जिंकली होती हे त्याच्या निधनाने समाजमाध्यमांवर ज्या तर्‍हेची हळहळ व्यक्त झाली त्यातून दिसलेच आहे. देखणे रूप नसतानादेखील त्याने आपला विशिष्ट चाहता वर्ग देशात तर निर्माण केलाच, पण सोबतच दमदार अभिनयाच्या जोरावर हॉलीवूडमध्येही पाय रोवले. चित्रपट कारकिर्दीत वेगाने पुढे जात असताना नियतीने मात्र त्याला धक्का दिला. त्याच्या मृत्यूने जीवनाच्या अनाकलनीयतेचा हा परिचित परंतु तरीही अधूनमधूनच सामोरा येणारा चेहरा सार्‍यांनाच स्तब्ध करून गेला. त्या स्तब्धतेतून सावरण्याआधीच गुरुवारी सकाळी बातमी आली ती उमद्या व्यक्तिमत्त्वाचा खानदानी कलाकार ऋषी कपूर याच्या जाण्याची. ऋषी कपूर 70-80च्या दशकात तरुण असणार्‍यांच्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग होता. बॉबीतल्या ‘हम तुम इक कमरे में बंद हो…’पासून कर्जच्या ‘दर्दे दिल, दर्दे जिगर’पर्यंत असंख्य गाण्यांमधून तो अनेकांच्या स्मृतींशी जोडलेला होता. त्याचा चॉकलेट बॉय लूक, त्याचे बेल बॉटम्स, त्याचे स्वेटर्स हे एका पिढीच्या स्मरणरंजनाचा अविभाज्य भाग होते. कपूर खानदानात जन्मल्यामुळे सहजपणे चिकणाचुपडा रोमँटिक हिरो रंगवत कारकिर्दीत पुढे गेलेल्या ऋषी कपूर यांनी अलीकडच्या काळात आपल्या सेकंड इनिंगमध्ये मात्र अनेक विविधरंगी भूमिकांतून स्वत:चे अभिनयगुणाचे नाणेही खणखणीत असल्याचे दाखवून दिले होते. बदलत्या काळाशी जुळवून घेत ट्विटरसारख्या आधुनिक माध्यमामार्फत ते अलीकडच्या काळात सामाजिक घडामोडींवरही सातत्याने व्यक्त होत होते. कोरोना संकटाच्या काळात लोकांनी डॉक्टर, पोलीस यांच्या विरोधातील हिंसेपासून दूर राहावे, असे हात जोडून केलेले आवाहन हे त्यांचे शेवटचे ट्विट ठरले. कॅन्सरच्या रूपात मृत्यूचे सावट घेरून असतानाही अखेरपर्यंत ते उमदेपणाने गप्पा करीत होते, जुन्या आठवणींना उजाळा देत होते असे समजते. जाता जाता हे दोन्ही कलाकार आपल्याला सध्याच्या या कठीण काळात जगण्यातला आनंद जपण्याचा मोलाचा संदेश देऊन गेले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply