मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दिलासा
मुंबई : प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्यांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन निधीतून नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी पाच हजार 380 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सीएमओच्या ट्विटर अकाऊंटवररून मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिली आहे.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात येणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाजपची साथ दिल्याने राज्याच्या राजकारणला वेगळीच कलाटणी मिळाली. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार यांची मनधरणी सुरू आहे. दुसरीकडे फडणवीस व पवार यांच्या शपथविधीला आव्हान देत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी निर्णय देणार आहे. सत्तासंघर्षाचे पडसाद सगळीकडे उमटले असताना, सोमवारी सकाळी फडणवीस आणि पवार हे एकत्रच मंत्रालयात पोहोचले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यामुळे विरोधक पुन्हा एकदा बॅकफूटवर गेले आहेत. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना अतिरिक्त मदत देण्यासाठी आणखी काय करता येऊ शकते यावर चर्चा झाली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी पाच हजार 380 कोटी रुपये मंजूर करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना दिलासा दिला आहे.
रुग्णाच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता धनादेश सुपूर्द
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख 20 हजार रुपयांचा धनादेश दादर येथील कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना त्यांच्या कर्करोगावरील उपचारासाठी सुपूर्द केला.
श्रीमती वेंगुर्लेकर यांच्यावर धन्वंतरी रुग्णालयात कर्करोगावर उपचार सुरू आहेत. या उपचारावरील खर्चासाठी त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीकडे काही दिवसांपूर्वी अर्ज केला होता. या अर्जावर तातडीने कार्यवाही होऊन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.