कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या हद्दीत असलेल्या गावठी दारूची भट्टी नेरळ पोलिसांनी उद्ध्वस्त केली.कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आतापर्यंत तिसर्यांदा नेरळ पोलिसांनी धाड टाकून अशी कारवाई केली आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी(दि. 2) सायंकाळी 8च्या सुमारास बेकरे येथील दोन जणांनी संगनमताने नागर खिंडीतील जंगल भागात गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी लावली होती. तेथे पोलीस पथकाला हातभट्टीसह दारू बनविण्यासाठी लागणारा गूळ व नवसागरमिश्रीत रसायन लपवून ठेवलेल्या स्थितीत आढळून आले. हा 25 हजार रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188, 34, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा 1949चे कलम 65 फ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूून, अधिक तपास सुरू आहे.
– पेणच्या सावरसईत ढाबाचालकावर गुन्हा
पेण : प्रतिनिधी
जमाबंदीचे आदेश असतानासुद्धा ढाब्यावर लोकांची गर्दी जमविल्याप्रकरणी पेण पोलिसांनी सावरसई येथील ढाबाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पेण तालुक्यातील सावरसई येथील कस्तुरी ढाबा नावाच्या हॉटेलमध्ये गर्दी जमवून चहा दिला जात असताना पोलिसांनी पकडले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 188,269 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005चे कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.