उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांत नाराजी
उरण : रामप्रहर वृत्त – नवघर गावात समुद्राच्या उधाणाचे पाणी वारंवार घुसून याबाबत राज्य शासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना केली जात नाही. यामुळे ग्रामस्थांत नाराजीचा सूर निघत आहे.
ग्रामपंचायत नवघरमधील नवघर गावामध्ये उधानाचे पाणी मोठ्या प्रमाणात आले आहे. यामुळे गावातील लोकांच्या घरामध्ये व घराबाहेर पाणी येऊन त्यांचे खूप हाल होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरी याची नोंद ग्रामपंचायतीने घेऊन सिडकोला पत्र देऊन याच्यावर ठोस उपाययोजना करण्यास सांगावे. तसेच ज्यांच्या घरात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. त्यांना ताबडतोब नुकसान भरपाई मिळण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
भर उन्हाळ्यात गावाची ही हालत तर पावसाळ्यात काय हालत होईल याचा विचारही करवत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. तरी काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. त्यापूर्वी यातून मार्ग काढून हा प्रश्न कायमचा निकाली काढावा, अशी ग्रामस्थांची मागणी पुढे येत आहे. तरी यावर ग्रामपंचायत व प्रशासन काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.