नवी मुंबई : बातमीदार
नवसंकल्प सामाजिक संस्था नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. या वर्षभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावा मुळे देशातील सर्वच घटक प्रचंड मोठ्या आर्थिक, मानसिक संकटात अडकले आहेत. टाळेबंदीमुळे नागरिकांचे नोकरी, उद्योगधंदे सुद्धा बंद झाले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी सुद्धा कित्येक पालकांना आर्थिक चणचण भासत आहे. याच सर्व गोष्टींचा विचार करत नवसंकल्प सामाजिक संस्थेने नेरेपाडा, पनवेल येथील वनवासी पाड्यामध्ये शैक्षणिक दिवाळी साजरी केली.
या उपक्रमांतर्गत नेरेपाडा या वनवासी पाड्यातील तब्बल 70 विद्यार्थ्यांना नवसंकल्प सामाजिक संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य (शाळेची बॅग, वह्या, पेन, पेन्सिल) देण्यात आले. भारताचे उज्जवल भविष्य हे शिक्षणातूनच साध्य होऊ शकते, म्हणून शैक्षणिक दिवाळी हा उपक्रम हाती घेतला, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर जगताप यांनी व्यक्त केले. यानंतर देखील प्रत्येक वर्षी संस्थेच्या वतीने असेच सामाजिक उपक्रम निरंतर राबवण्यात येतील, असे सचिव राजेश गावडे यांनी सांगितले.
या वेळी संस्थेचे सदस्य आकाश घाडगे, मयुरेश चव्हाण, उमेश बागल, अजित भैरवकर, अक्षता म्हामूनकर, प्रणित अहिरेकर, केतन पाटील, प्रमोद यादव, साहिल देशमुख, प्रतीक खामकर व स्थानिक नागरिक बाळाराम रोडपालकर हे उपस्थित होते.