मुरुड : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनकाळात राज्य सरकारने एसटी वाहतूक सुरू केली नाही. परंतु एसटी वाहतूक बंद केल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उत्पन्न घटल्यामुळे एसटी कर्मचारी पगाराविना बसले आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विभागीय कार्यालयातील कर्मचारी लोकांचे पगार हे महिन्याच्या एक तारखेला होत असतात, तर सर्व आगारातील कर्मचार्यांचे पगार हे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला होत असतात परंतु परस्थिती अशी निर्माण झाली आहे, की दोन्ही तारखा जाऊन सुद्धा पगार होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचारी वृंदाचे मोठे हाल होत आहेत. अत्यावश्यक सेवा म्हणून एटीचे चालक व वाहक ठाणे मुंबई सारख्या ठिकाणी गरजूंना सुविधा पुरवीत आहेत.
कुटुंब गावाकडे तर कमावता माणूस मुंबईत त्यामुळे गावाकडील कुटुंबाला पैशाची मोठी चणचण भासत आहे. एसटी राज्य शासनाच्या 35 योजना राबवत आहे. सर्वाधिक सामाजिक सेवा ही एसटी वाहतुकीमुळे केली जात आहे. तर इतर घटकापेक्षा पगाराची सर्वात कमी पातळी एसटीमध्ये आहे, तरी सुद्धा कर्मचारी मोठ्या आनंदाने सेवा देत असतात संपुर्ण महाराष्ट्रात एसटीची 31 विभागीय कार्यालय व 246 आगार आहेत. प्रत्येक आगारात दोनशे पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. लाखोंच्या संख्येने हे कर्मचारी आज वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुरुड आगारात 219 कर्मचारी कार्यरत आहेत परंतु त्यांना सुद्धा पगार मिळालेला नाही. मार्च महिन्याचा पगार एप्रिल महिन्यात मिळाला तो सुद्धा राज्य शासनाने 150 कोटी रुपये विविध योजनांची येणे रक्कम जमा केल्यावर 70 व 50 टक्क्याप्रमाणे पगार जमा करण्यात आले, परंतु आता एप्रिल महिन्याचा पगार मे मध्ये देणें आवश्यक असताना सुद्धा मे महिन्याचा 16 तारीख उलटून गेली असताना सुद्धा निधी उपलब्ध नाही, म्हणून अद्याप राज्यातील कोणत्याही आगार कर्मचारी वृंदाचे पगार जमा करण्यात आलेले नाहीत.
प्रत्येक महिन्याचा पगार जवळ आला की निधीच्या कमतरतेमुळे पगार लांबणीवर पडत आहे. शासनाकडे रोज रोज मागणी करण्यापेक्षा अपघात सहाय्यता निधी रक्कमेचा वापर करावा, अशी मागणी होताना दिसत आहे. मार्च व एप्रिल महिन्याचे पगार वेळेवर न झाल्यामुळे कर्मचारी वृंदाकडून ही मागणी होताना दिसत आहे.एसटीमधील कामगारांचा दर महिन्याला पगार उशिरा होत असल्याने निदान एसटी सेवा तरी सुरू करावी. त्यामुळे कर्मचारी वृंदाचे पगार तरी वेळेवर होतील, अशी अपेक्षा एसटीमधील कमगारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.