अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद करणार सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणार्या पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते. या वर्षीपासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या व्यक्तींना लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 51 हजार 111 रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परिषदेला दिलेल्या 25 लाख रुपयांच्या माध्यमातून व त्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे. फेब्रुवारी 2026मध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी 10 पत्रकारांचा गौरव केला जातो. यामध्ये परिषद स्वतःच्या निधीतून एका ज्येष्ठ पत्रकाराचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करीत असते. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
या वर्षीपासून सामाजिक आणि शेक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या एका मान्यवर व्यक्तीचा लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. निवड समिती पुरस्कार्थींची निवड करते आणि त्या अनुषंगाने पत्रकारितेच्या क्षेत्रात परिषदेचे पुरस्कार मानाचे समजले जातात. यापुढे एका समाजसेवकाचा सन्मान परिषदेच्या या पुरस्कारांची उंची वाढवणार आहे.
या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख, मिलिंद अष्टीवकर आणि पनवेल तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी नुकतीच पनवेल येथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार यंदापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणार्या एका व्यक्तीचा गौरव लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक-शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने केला जाणार असल्याने पत्रकारितेबरोबरच समाजकार्यासाठीही या व्यासपीठावर सन्मानाची नवी दिशा मिळणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper