मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र नुकतीच घटना घडल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने मृत महिलेच्या घरातील सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
मिठेखारमधील महिलेवर अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयानंतर मुंबईतील जे जे हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू होते, मात्र 11 मे रोजी या महिलेचे निधन झाले. 13 मे रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असता, तिचा मृत्यू कोरोना विषाणूमुळे झाल्याचे समोर आहे. त्यामुळे या महिलेच्या घरातील सात सदस्यांची जिल्हा शासकीय रुग्णालात वैद्यकीय तपासणी करून त्यांचे स्वॅब चाचणीकरिता जे जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पाच दिवसांनी निगेटिव्ह आल्याने मुरूड तालुका तणावमुक्त झाला आहे. या सातही सदस्यांना मागील आठ दिवसांपासून क्वारंटाइन रुममध्ये ठेवण्यात आले आहे, परंतु आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दोन दिवसानंतर त्यांना होम क्वारंटाइल करणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.