Breaking News

गणपती कारखानदारांना राज्य सरकारने मदत करावी

भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी

पेण : प्रतिनिधी – गणरायाचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये गणपतीचे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. असंख्य सुशिक्षित बेरोजगार या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणपती कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी केली आहे.

पेण तालुक्यातील विशेषकरून हमरापूर, जोहे, कळवा या भागात अनेक गणपती कारखानदार कार्यरत आहेत. त्यांच्या कारखान्यांमध्ये मातीच्या आणि प्लास्टरच्या मूर्ती साकारल्या जात असतात. राज्य सरकारने प्लास्टर ऑफ पॅरिसबाबत काही सूचना दिल्या आहेत, परंतु या वर्षीचा गणेशोत्सव 22 ऑगस्ट रोजी असल्याने मोजून काही दिवस राहिलेले आहेत. देश आर्थिक संकटाला व महागाईला सामोरा जात असताना प्लास्टरवर बंदी घालणे आताच्या परिस्थितीत योग्य नाही.

गणपती कारखानदारांचे प्रश्न स्थानिक आमदार रविशेठ पाटील, रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या समस्यांना योग्य न्याय देण्यासोबतच सध्याच्या परिस्थितीमध्ये गणपती कारखानदारांना आर्थिक मदतीचे विशेष पॅकेज राज्य सरकारने देणे गरजेचे आहे. अन्यथा अनेक कारखानदारांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ येऊ शकते. याची राज्य सरकारने दखल घ्यावी, असे बंडू खंडागळे यांनी म्हटले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply