Breaking News

लॉकडाऊनमध्ये रायगडात अडकलेले 24 हजार 729 मजूर स्वगृही रवाना

अलिबाग : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यासह शेजारील नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा राज्यातील तब्बल 24 हजार 729 मजूर व व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी पाच, झारखंडकरिता तीन, उत्तर प्रदेशकरिता सहा, राज्यस्थानकरिता एक, तर बिहार आणि ओडिशासाठी प्रत्येक एक रेल्वे सोडण्यात आली आहेत. स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी शासन व प्रशासनाला धन्यवाद दिले.

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध राज्यांतील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते. तसे मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा येथील मजूर व व्यक्ती रायगड जिल्ह्यातही अडकले होते. शासन आणि जिल्हा प्रशासन या मजुरांची व्यवस्थित काळजीही घेत होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरू लागल्याने शासन व प्रशासनाने संबंधित राज्यांशी  समन्वय साधला.

रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हेाती. त्यांना आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. या सर्वांना रायगड जिल्हा तसेच नवी मुंबईच्या विविध भागांतून पनवेल रेल्वेस्थानकात बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणार्‍या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यात आले होते.

रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईझ करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतुकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहर्‍यावर समाधान होते, ओढ होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे टाळ्या वाजवून मन:पर्वूक आभार मानले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply