Breaking News

पनवेलच्या सीकेटी महाविद्यालयाचा भारतातील पहिल्या शंभरात समावेश

‘एज्युकेशन वर्ल्ड’ची टॉप रँकिंग यादी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त – राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशन वर्ल्ड या मासिकाने एप्रिल 2020च्या विशेषांकामध्ये सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील भारतातील खासगी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे. या यादीत दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या नामवंत अशा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालयास देशात 69वे, तर राज्यात 21वे रँकिंग प्राप्त झाले आहे.

भारतामध्ये 747 स्वायत्त महाविद्यालये आहेत. यामध्ये ’एज्युकेशन वर्ल्ड’ने पनवेलमधील खांदा कॉलनी येथील सीकेटी कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील 69वे आणि राज्य स्तरावरील 21व्या क्रमांकाचे रँकिंग दिले आहे. प्राध्यापकांची क्षमता, प्राध्यापक कल्याण आणि विकास, अभ्यासक्रमाचे अध्यापन, प्लेसमेंट, पायाभूत सुविधा आणि नेतृत्वाची गुणवत्ता या निकषांमध्ये महाविद्यालयाने स्वायत्तता मिळाल्यापासून कठोर परिश्रम घेतले आहेत व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे ते एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली तसेच मुंबई विद्यापीठाने स्वायत्तता बहाल केली असून अत्यंत अल्पावधीत कॉलेजने खूप मोठे यश प्राप्त केले आहे.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 26 सप्टेंबर 1997 रोजी चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. सर्व स्तरातील दर्जेदार शिक्षण देण्याचे आणि अनेक करिअर आधारित पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांसह प्रभावी शिक्षण आणि शिकण्याची सुविधा या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्याने ते सक्षमपणे आधुनिकीकरणाच्या युगात कार्यरत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय आणि संस्था काम करीत आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी स्वायत्त महाविद्यालयास यापूर्वीच नॅक पुनर्मूल्यांकनाद्वारे ए प्लस (ए+) दर्जा मानांकित, विद्यापीठ अनुदान आयोगाचा श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय दर्जा आणि मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पारितोषिक तसेच अनेक पुरस्कार व मानांकने प्राप्त झाली आहेत. आता या महाविद्यालयास ’एज्युकेशन वर्ल्ड’कडून आणखी एक मोठा बहुमान प्राप्त झाला असून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा खोवला गेला आहे. पनवेलसह रायगड, नवी मुंबई, मुंबई तसेच राज्यभरात सीकेटी महाविद्यालयाचा नावलौकिक असून या यशामुळे पनवेल परिसर, नवी मुंबई तसेच मुंबई विद्यापीठ स्तरावरील अधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यांच्याकडून महाविद्यालयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने देशात 55 आणि राज्यात 15वे रँकिंग प्राप्त केले आहे. सातारा येथील धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाने देशात 59वे आणि राज्यात 17वे, कराड येथील सद्गुरू गाडगेबाबा महाराज महाविद्यालयाने देशात 74वे आणि राज्यात 23वे तसेच सातारा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने देशात 79वे आणि राज्यात 26वे रँकिंग मिळविले. रयत शिक्षण संस्थेच्या या चार महाविद्यालयांनी ’एज्युकेशन वर्ल्ड’च्या यादीत स्थान मिळवून दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम राखली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply