उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील आवरे येथील ज्ञानेश्वर ठाकूर या शेतकर्याला जखमी अवस्थेत सापडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला पक्षी मित्रांनी उपचार करून वनविभागाच्या आधिकार्यांच्या समक्ष जंगलात सोडून जीवदान देण्याचे काम केले आहे.
आवरे येथील शेतकरी जवळच असणार्या जंगलात नेहमी प्रमाणे आंबे काढण्यासाठी गेले असता त्यांना जखमी अवस्थेत मोर आढळून आला. त्याच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्याला धड उडता ही येत नव्हते त्यांनी त्या मोराला घरी आणून गावातील सरपंच ,पोलिसपाटील यांच्या मदतीने पक्षी मित्रांना फोन करून बोलावून घेतले.
पक्षीमित्र वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आनंद मढवी यांनी त्या जखमी मोराला ताब्यात घेऊन पशु वैद्यकीय अधिकारी संतोषसिंग धाबेराव यांनी त्या मोर पक्षावर उपचार करून पुन्हा पक्षी मित्रांच्या ताब्यात देऊन त्यांनी त्या मोराला वन आधिकार्यांच्या समक्ष जंगलात मुक्त विहार करण्यासाठी सोडून दिले. यावेळी वनक्षेत्ररक्षक संतोष इंगोले, वन्यजीव निसर्ग संस्थेचे सदस्य आनंद मढवी, महेश भोईर, पक्षी मित्र जयवंत ठाकूर, बंटी शेळके, विनीत मढवी, शुभम मढवी, रवींद्र गावंड, मनिष मढवी आदी उपस्थित होते.