Friday , June 9 2023
Breaking News

अपमान की परीक्षा?

मोदीविरोध करता-करता आपण राष्ट्राच्या विरोधात कधी उभे ठाकलो हेच राहुल गांधी यांना कळले नाही हे उघड दिसते. खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या सार्वभौम सभागृहाचा अपमान केला असून सभागृहात येऊनच त्यांनी माफी मागितली पाहिजे असा आग्रह भाजपच्या खासदारांनी आक्रमकपणे लावून धरला आहे. याउलट माफी मागण्याचा प्रश्नच नाही असा हेका काँग्रेसने चालू ठेवला आहे. या भांडणामध्ये संसदेचे कामकाज मात्र गेले काही दिवस बंद पडले आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनाचा चौथा दिवस देखील गुरूवारी कामकाजाअभावी वाया गेला. देशभरातील जनतेचे प्रश्न सोडवणारे संसदेसारखे सार्वभौम सभागृह चार-चार दिवस कामकाजाविना ठप्प राहते हे नक्कीच अशोभनीय आहे. काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मध्यंतरी केलेल्या परदेश दौर्‍यात बरीच मुक्ताफळे उधळली होती. गांधी यांच्या मनातील मोदी द्वेष आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील विखार लपून राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आगपाखड करण्याची एकही संधी गांधी परिवारातील कुणीही सोडत नाही. राहुल गांधीही त्यास अपवाद नाहीत. परंतु मोदीविरोध करता-करता देशाच्या विरोधात भलतीसलती वक्तव्ये करणे हे त्यांच्या अंगवळणीच पडून गेले आहे. खासदार राहुल गांधी यांनी मध्यंतरी इंग्लंडचा दौरा केला. तेथील केंब्रिज विद्यापीठात आपल्याजवळचे मौलिक विचारधन त्यांनी वाटले. इंग्लंडमध्ये त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार लोकशाहीबाबत आपली विचारमौक्तिके उधळली. ती उधळताना त्यांनी भारतीय लोकशाही धोक्यात असून अन्य देशांनी लोकशाही टिकवण्यासाठी हस्तक्षेप करायला हवा अशा आशयाची लांछनास्पद विधाने केली. देशाच्या सार्वभौमत्वाबाबत कुठलीही पर्वा न करणारा बेदरकार मनुष्यच अशाप्रकारे बडबड करू शकतो. सत्तरीच्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जनता पक्षाने पराभव केल्यानंतर त्या देखील परदेशात गेल्या होत्या, परंतु विरोधकांबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला होता. निवडणुका ही देशांतर्गत बाब आहे, त्याबाबत इथे बोलणे इष्ट नव्हे असे उत्तर त्यांनी परदेशी पत्रकारांना दिले होते. आजीने जे भान दाखवले, ते नातवाला मात्र बाळगता आले नाही. भारतातील लोकशाही धोक्यात असल्याची उदाहरणे देताना खासदार राहुल गांधी यांनी आपल्याला संसदेत बोलू दिले जात नाही. प्रसंगी आपल्या पुढ्यातील माइक बंद केला जातो असे म्हटले. तसेच नोटबंदी किंवा चीनी आक्रमण या विषयावर संसदेत चर्चा करू दिली गेली नाही असेही त्यांनी बेधडक सांगितले. अर्थात यामध्ये काहीही तथ्य नाही हे सारेच जाणतात. संसदेमध्ये बोलून आपली बाजू मांडण्याऐवजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेणे पसंत केले. भारतीय लोकशाहीसाठी हे कसोटीचे दिवस आहेत असा त्यांचा दावा आहे. ‘भारत जोडो’ पदयात्रेनंतर खासदार गांधी यांनी ज्या काही थोड्याफार सदिच्छा मिळवल्या होत्या, त्या सार्‍याच्या सार्‍या इंग्लंड दौर्‍यातील बेताल बडबडीमुळे नष्ट झाल्या असेच आता म्हणावे लागेल. खासदार गांधी हे वक्तशीर संसदपटू कधीच नव्हते व नाहीत. अभ्यासपूर्ण भाषणांसाठीही त्यांची ख्याती नाही. संसदेसमोर येऊन त्यांनी एकवार माफी मागितली असती, किमान ‘सॉरी’ म्हटले असते तरी भागले असते. परंतु अहंकार त्यांना तसे करू देत नाही. भाजपनेदेखील हा विषय धसाला लावण्याचे ठरवलेले दिसते. दोन्ही पक्षांनी एकेक पाऊल मागे घेत संसद पूर्ववत सुरू केल्यास जनतेचे प्रश्न मार्गी लागू शकतील.

Check Also

कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर शांतता कमिटीची बैठक

पनवेल : वार्ताहर सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी …

Leave a Reply