Breaking News

दारूबंदीसाठी महिला सरसावल्या

आसल ग्रामपंचायतीच्या 300हून अधिक महिलांच्या स्वाक्षर्‍या

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी आहे. सर्व ग्रामस्थदेखील दारूबंदीचा निर्णय कठोरपणे पाळतात, मात्र तेथील एका रिसॉर्टमध्ये अनधिकृतपणे दारूविक्री केली जात असून त्याविरुद्ध ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी 300हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले असून, आता रायगडच्या महिला जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, बंगलो प्रकल्प साकारण्यासाठी शासनाकडून जमीन बिनशेती करण्यात आली असून त्या जमिनीचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात असल्याने महिलांनी त्या रिसॉर्टवर नियमभंग केल्याबद्दल आणि दारूविक्री करीत असल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. आसल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीत असलेल्या गावात दारूबंदी केली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन चार आदिवासी वाड्या आणि गावातील गावठी दारूच्या भट्ट्या बंद केल्या होत्या. त्यामुळे मागील काही वर्षांपासून या ग्रामपंचायतीमधील प्रामुख्याने आदिवासी बांधव व्यसनाच्या बाहेर पडले असून श्री बैठक आणि अन्य धार्मिक मार्गाला लागले आहेत, मात्र दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी सुरू झालेल्या सेव्हन स्टार रिसॉर्टमध्ये खुलेआम दारू विकली जात आहे. त्या ठिकाणी दारू पिण्यासाठी येणारे लोक रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍या महिला आणि मुलींना पाहून शेरेबाजी करीत असतात. त्यामुळे तेथील महिला प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत असाल, भूतीवली, वडवली, पाडा ही गावे आणि चार आदिवासी वाड्यांमधील महिलांनी आक्रमक होऊन ग्रामपंचायतीने कारवाई करावी, अशी भूमिका घेतली होती. आसल ग्रामपंचायतीमधील वडवली येथील शोभा शेंडे यांच्या पुढाकाराने दारूबंदीसाठी सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली. त्यांनी न घाबरता आसल, वडवली, पाडा, भूतीवली या गावांत आणि चार आदिवासी वाड्यांत जाऊन दारूबंदीसाठी महिलांच्या सह्या घेतल्या आहेत. साधारण 300हून अधिक महिलांच्या सह्या एकत्रित करून त्यांचे निवेदन रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना जलद पोस्टाने पाठवले आहे. त्याची प्रतदेखील शोभा शेंडे यांनी आसल ग्रामपंचायतीकडे सादर केली आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply