Breaking News

कर्जत, माणगावात रुग्ण वाढले; सर्व बाधित गावाबाहेरील; स्थानिक अद्याप सुरक्षित

कर्जत, माणगाव ः बातमीदार

कर्जत तसेच माणगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कर्जत शहरात सलग तिसरा रुग्ण आढळून आला असून शहराला लागून असलेल्या तमनाथ गावातील पोपटबागेतही एकाला कोरोना झाला. कर्जत शहरासाठी ही धोक्याची घंटा असून कर्जत शहरालगत असलेल्या गावात आता कोरोना पोहचला आहे. तसेच माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले गावात कोरोनाचा पहिला रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. त्यानंतर तालुक्यातील अन्य गावांतून कोरोनाचे रुग्ण आढळले. कुशेडे तर्फे गोवेले गावातील दोघांचा स्वॅब रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कुशेडे गावात आता कोरोनाबधितांची एकूण संख्या नऊ झाली असून माणगाव तालुक्यात एकूण बाधितांची संख्या 31वर पोहचल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली.

 कर्जत शहरातील गुंडगे भागात असलेल्या मंगलमूर्ती इमारतीत 19 मे रोजी लोणावळा येथून एक व्यक्ती राहायला आली होती. त्याची माहिती मिळताच कर्जत नगर परिषद प्रशासनाने त्या व्यक्तीला लगेच त्या इमारतीतील घरात होम क्वारंटाइन केले होते, मात्र 21 मे रोजी त्याला ताप आणि खोकला सुरू झाल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता तेथून पनवेल कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने सोमवारी सकाळी कर्जत नगर परिषद आरोग्य विभागाने मंगलमूर्ती अपार्टमेंट निर्जंतुक करण्यास सुरुवात केली. गुंडगे येथील हा रुग्ण कर्जत शहरातील तिसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे.

कर्जत शहराजवळ तमनाथ गावाबाहेरील पोपटबागेत असलेल्या आरएमसी प्लांटमध्ये झारखंडमधील एक मजूर काम करीत होता. हा मजूर पोपटबागेबाहेर पडला नाही, परंतु तरीही त्याला त्रास जाणवू लागल्याने 21 मे रोजी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. तेथे तो कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोपटबागेला कर्जत आरोग्य विभागाच्या मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्राने कंटेन्मेंट झोन जाहीर केले. सध्या ही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. या दोन्ही नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडून तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11वर पोहचली आहे. त्यात कर्जत शहरातील तीन व ग्रामीण भागातील आठ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सेफ असलेला माणगाव तालुका लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मात्र कोरोनाबाधित झाला. तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले, मुठवली तर्फे तळे, देवळी, कविलवहाळ, कालवण कळमजे, वाकी तर्फे निजामपूर, पळसगाव बु, पन्हळघर  खुर्द, नगरोळी, मुर, कोस्ते बु., रिळे आदी गावांतून एकूण 31 रुग्ण आढळलेत. तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण कुशेडे तर्फे गोवेले गावात आढळले. हे सर्व रुग्ण मुंबईतून आले आहेत. गावात कायम राहणार्‍यांना अद्याप बाधा झाली नसून अनेकांनी वेळीच सतर्कता बाळगळ्याने स्थानिक गावकर्‍यांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. प्रशासन मुंबई, पुणे व अन्य ठिकाणांहून येणार्‍या नागरिकांवर लक्ष ठेवून आहे. त्यांना लगेचच क्वारंटाइन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या नजरेआड कोणी बाहेरून आल्यास त्याची माहिती गावकर्‍यांनी प्रशासनाला द्यावी. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाईल. ग्रामस्थांनी आपल्या सुरक्षेसाठी प्रशासनास सहकार्य करून कोरोनामुक्तीसाठी सर्वांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन माणगावच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply