Breaking News

पोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू

प्रयोगशील शेतकर्‍याची किमया

पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चाळीचा कोंड येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी शेतात लावलेल्या पेरूच्या बागेत अर्धा ते पाऊण किलोचे फळ आले आहे. या भल्यामोठ्या आकाराच्या पेरूचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने कदमशेठ यांच्या मुलांनी या पेरूंना परिसरातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालविला आहे.

बोरावळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चाळीचा कोंड या गावातील सावित्री, ढवळी आणि कामथी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर प्रयोगशील शेतकरी रामचंद्र रावजी कदमशेठ यांनी तीन एकर जमिनीवर व्हीएनआर पेरूची सुमारे 1500 हून अधिक रोपे लावली. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून ही रोपे रणरणत्या उन्हात जगवित वाढवली. गेल्या वर्षी त्रिवेणी संगमावर पुराच्या पाण्याचा प्रचंड जलौघ येऊन ते पाणी कदमशेठ यांच्या शेतातून सर्वत्र फिरल्याने काही रोपे कुजून वाहून गेली. यानंतर अनेक रोपांना आधार देत पुन्हा देखभाल व मशागत करून उभारी आणून त्यांनी जोपासना केली.

यंदा तब्बल अडीच ते तीन टनावर पेरू उत्पादनाची अपेक्षा असून एका फळाचे वजन तब्बल पाचशे-सहाशे ग्रॅमपासून पाऊण किलो असल्याने या मोठ्या आकाराच्या फळाची सर्वांना भुरळ पडली आहे. पेरूचा मंद सुगंध आणि आकर्षक आकार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने मध्ये कदमशेठ यांना यंदाचे पेरूचे उत्पादन महाड, बिरवाडी, पोलादपूर, तुडील, राजेवाडी, माणगांव, लोणेरे या भागात त्यांच्या वाहनाने पोहोचवून स्वत:च विक्री करावे लागले आहे. पोलादपूर शहरातील शिवाजीनगर येथील दुकानामध्ये त्यांची मुलगी विमल आणि नातू अतुल या पेरूंची विक्री करीत आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply