Breaking News

उरण तालुक्यात 75.28 टक्के मतदान

70 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीच्या 70 जागांसाठी शुक्रवारी (दि. 15) झालेल्या निवडणूकीसाठी 75.28 टक्के मतदान झाले झाले. त्यात चाणजे 71.29, केगाव 78.28, नागाव 77.27, म्हातवली 78 .91, फुंडे 87.14, वेश्वी 90.50  टक्के मतदान झाले. सहा ग्रामपंचायतीत 30463 मतदार असून त्यातील 22,932 मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

उरण तालुक्यातील चाणजे, केगाव, नागाव, म्हातवली,  फुंडे, वेश्वी या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्तात सहा ग्रामपंचायतीच्या 43 मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या सत्रात अनेक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये मतदान करुन कामावर जाण्याची घाई असलेल्या कामगारांची संख्या अधिक होती. मतदारांना मतदान केंद्रावर आणुन सोडण्यासाठी उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्ते सर्रास रिक्षा, दुचाकी वाहनांचा वापर करताना दिसत होते. निवडणुकीसाठी भाजप आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी मांडलेल्या टेबलावरुन मतदारांना मतदानाच्या स्लिप, क्रमांक देऊन मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. त्यामुळे पक्षाच्या टेबलासभोवार कार्यकर्ते आणि मतदारांची गर्दी होत होती.

चाणजे ग्रामपंचायतीच्या प्रभाग मधील एका मतदान केंद्रावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मतदान यंत्र काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते. त्यामुळे दहा मिनिटांचा खोळंबा झाला. मात्र तत्काळ बंद पडलेले मतदान यंत्र बदलण्यात आले. यामुळे मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू झाली. तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा आढाव घेतला. किती टक्के मतदान झाले याची माहिती नायब तहसीलदार संदिप खोमणे यांनी दिली. तर पोलिसांनी ठेवलेल्या चोख बंदोबस्तामुळे उरणमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याने मतदान प्रक्रिया शांततेत झाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply