सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरते मर्यादित असलेले कोरोनाचे संक्रमण एव्हाना गाव-खेड्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. मुंबईपासून जवळ असणार्या रायगड जिल्ह्यामध्ये विशेषकरून पनवेल परिसरात कोविड-19चा सर्वाधिक प्रादुर्भाव होता व आजही आहे, पण आता जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचा शिरकाव झालेला दिसून येतो. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 15 तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.कोरोनाने रायगड जिल्ह्याला आपल्या कवेत घेतले आहे. रुग्ण आणि मृतांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. रुग्णांच्या संख्येने एक हजारांचा आकडा पार केला आहे. याआधी पनवेल तालुका त्यातही महापालिकेचा शहरी भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होता. हळुहळू तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने हातपाय पसरले. यातील बहुसंख्य रुग्णांचे मुंबई कनेक्शन दिसून आले आहे. दैनंदिन अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्यांमुळे पनवेल परिसरासह तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्यसेवक, पोलीस, डॉक्टर यांसारख्या सेवाकर्मींना कोरोनाची लागण होत असून, त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना संसर्ग होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. याशिवाय मुंबईहून आपल्या मूळ गावी चाकरमानी परतले आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या काम-धंदा नसल्याने त्यांना गावी परतण्यावाचून पर्याय नव्हता, पण यातील अनेक जण येताना कोरोना सोबत घेऊन आले असल्याने ग्रामीण भागात घबराट पसरली आहे. वास्तविक, राज्य शासनाने मुंबईहुन गावी परतणार्यांना त्यांची कोविड-19 चाचणी करूनच पाठवायला हवे होते. तसे केले गेले असते तर आज कोकणाचे चित्र वेगळे असते, मात्र परिस्थिती नीट हाताळता न आल्याने धोका वाढला आहे.
सुदैवाने काही ठिकाणचे ग्रामस्थ मुंबईतून परतलेले लोक आपलेच बंधू-भगिनी आहेत असे समजून त्यांची चांगल्या प्रकारे व्यवस्था करतानाही पहावयास मिळत आहे, पण अनेक ठिकाणचे लोक कोरोनाच्या भीतीने बाहेरून आलेल्यांना बहिष्कृतासारखी वागणूक देत आहेत. त्यांच्यात प्रसंगी वादही झडत आहेत. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने भीती वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आताच्या काळात एकमेकांना आधार देणे जरुरीचे आहे. योग्य काळजी घेतल्यास कोरोनाचा फैलाव रोखता येऊ शकतो. मुख्य म्हणजे कोरोना झालेल्या अनेक रुग्णांनी उपचाराअंती या महामारीवर यशस्वीपणे मातही केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 589 रुणांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत धीर आणि संयम महत्त्वाचा आहे. सध्याचे संकटाचे दिवस नक्कीच सरतील. त्यासाठी माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे जरुरी आहे.
-समाधान पाटील, अधोरेखित