खारघर : प्रतिनिधी
पावसाळा तोंडावर आला आहे. त्यादृष्टीने पावसाळापुर्वी शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यावर्षी कोविड 19 च्या धोक्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी यावर्षी कृषी विभागाला शेतकर्यांना बांधावर बियाणे व खते उपलब्ध करून देण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. या अंतर्गत पनवेल तालुक्यात सुमारे 70 गटातील 2230 शेतकर्यांना त्यांच्या प्रत्यक्ष शेताच्या बांधावर बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या माध्यमातुन गट तयार करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी आर. डी. चौधरी, मंडळ कृषी अधिकारी आर. आर. पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी वेगवगेळ्या गावात बियाणे वाटप करीत आहेत.
याच उपक्रमाअंतर्गत शिरढोण, शिरढोण पाडा, चिंचवन, सांगुर्ली या गावांमध्ये पाच गटातील 280 शेतकर्यांना 28 क्विंटल बियाणे,19.90 टन खत शेतकर्यांच्या घरी कृषी विभागाच्या अधिकारी देवयानी गलांडे यांच्यामार्फत पोहचविण्यात आले आहे. तसेच पनवेल तालुक्यात 70 गटामध्ये 142.02 क्विंटल बियाणे (भात पीक) तसेच सुमारे 246.02 टन खत वाटप करण्यात आले असल्याचे मंडळ कृषी अधिकारी पाचपुते यांनी सांगितले आहे.