Breaking News

रायगडातील महाआघाडीत यादवी

खासदार तटकरे आणि माजी आमदार जगतापांमध्ये जुंपली

महाड : प्रतिनिधी – सध्या सर्व जण कोरोनाविरुद्ध लढा देत असताना रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांचा कार्य अहवाल धादांत खोटा असल्याचा आरोप केला होता. त्यावर गेली 36 वर्षांच्या काळात आपण जनतेशी बांधिल राहून काम केले आहे. त्यामुळे जगताप यांनी अभ्यास करून बोलावे, असा टोला खासदार तटकरे यांनी लगावला आहे.

रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाआघाडीच्या सरदारांमध्ये यादवी पाहावयास मिळत आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, असे म्हटले जाते, मात्र दक्षिण रायगडात एकाच म्यानात तीन तलवारी घुसडल्या जात आहेत. आता त्यांच्यातील शाब्दिक संघर्ष दिसू लागला आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या कार्य अहवालावर माजी आमदार जगताप यांनी टीका केली होती. अलिबागऐवजी महाड येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्याला शनिवारी खासदार तटकरेंनी खोचक शैलीत उत्तर दिले.

खासदार तटकरे म्हणाले की, खासदार म्हणून 23 मे रोजी मला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सादर केलेल्या कार्य अहवालात लोकसभेतील कामे, आरोग्य विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पर्यटन आदी विषयांचा उल्लेख केला, मात्र महाडमध्ये माजी आमदार माणिक जगताप यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. खोटे बोलणे हा माझा धर्म नाही. माझी बांधिलकी जनतेशी आहे. महामार्गाच्या कामात आपण केंद्र स्तरावर काय पाठपुरावा केला याचा पुरावा पाहिजे असेल तर तोही मिळेल. यूपीएचे सरकार असताना या कामाला चालना मिळाली असली तरी ना. नितीन गडकरी यांनी या कामाला गती दिल्याचेही त्यांनी सांगितले.

अलिबागमध्ये जिल्हा मुख्यालय आहे. या ठिकाणी 300 बेडचे हॉस्पिटल आहे. यामुळे तेथे मेडिकल कॉलेज होणे शक्य आहे, मात्र अभ्यासू माणसाने अभ्यास न करताच टीका केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला जागा देण्याबाबत आपण पाठपुरावा केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत डॉ. लहाने यांना सुचविले, मात्र जिथे हॉस्पिटल करावे लागते त्या ठिकाणी अशी जागा देता येणार नाही. अर्थमंत्री असताना मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली, पण अलिबागमधील उसरची औद्योगिक क्षेत्रातील जागा मोफत देण्याचे कळवले. 6 मार्च रोजी 25 एकर जागा मोफत देण्यात आली आहे. याबाबत डॉ. लहाने यांनी शिफारशीसह पत्र दिले आहे. शिवाय केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लोकसभेतील प्रश्नाला दिलेले उत्तरदेखील देऊ शकतो. मी खोटे बोलणारा नाही व खुलासा देण्यास मी बांधिल नाही. हा काळ खुलासा किंवा टीका करण्यासाठी नाही. संकटातून बाहेर पडल्यावर उत्तर देऊ, असे खडे बोलही या वेळी खासदार तटकरे यांनी माजी आमदार जगताप यांना सुनावले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply