माणगाव ः प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात शनिवारी (दि. 30) नवघर येथे दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांचा स्वॅब रिपोर्ट शनिवारी आल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाबरोबरच तालुक्यातील जनतेची डोकेदुखी वाढली आहे. तालुक्यात एकूण 41 जण कोरोनाबाधित होऊन यापैकी सहा रुग्ण बरे झाल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. माणगाव तालुक्यात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून कोरोनाबाधित रुग्ण सापडायला सुरुवात झाली. लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यापर्यंत माणगाव तालुका कोरोनामुक्त होता. त्यामुळे तालुक्यातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला होता. तरीदेखील मुंबईकर मंडळी ज्यावेळेस गावांकडे येतील त्यानंतर काय परिस्थिती राहील हे सांगता येत नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. एप्रिल व मे महिन्यात मुंबईहून अनेक चाकरमानी माणगाव तालुक्यात गावात येऊन दाखल झाले आहेत.
मुंबईत कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. त्या ठिकाणी झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतून गावी दाखल झालेले चाकरमानी बाधित रुग्ण माणगाव तालुक्यातील गावातून पुढे येत आहेत.प्रशासनाने मुंबईकर मंडळींबरोबरच अन्य दुसर्या शहरांतून व जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना लगेचच क्वारंटाइन करून विशेष खबरदारी घेतली आहे. शिवाय बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करून त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदारांनी देऊन तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने ही बाब गंभीर असून तालुक्यातील जनतेने सरकारच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे.
पाले बुद्रुक परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग ः जिमाका
जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे पाले बुद्रुक येथे एक व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेल्या मौजे पाले बुद्रुक, ता. रोहा येथील कोरोना रुग्ण राहत असलेल्या घराचा परिसर, पश्चिमेकडील नारायण बाळू कदम यांचे घरापासून ते दक्षिणकेकडील राजेश दिनकर चव्हाण यांच्या घरापर्यंतचा परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.
या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.
विधवा, निराधार महिलांना अन्नधान्याचे वाटप
पाली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीत व लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कुणाचीही उपासमार होऊ नये याकरिता बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने शेकडो विधवा व निराधार महिलांना अन्नधान्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. बेणसे ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर पारधी, उपसरपंच राजेश गोरे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य प्रीती कुथें, माजी उपसरपंच उद्धव कुथे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने निराधार कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक साहित्य पुरविण्याची संकल्पना राबविण्यात आली. लॉककडाऊनमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब, मजूर, कष्टकरीवर्गासह आदिवासी बांधव भरडून गेला आहे. लॉकडाऊनचा कालावधी जसाजसा वाढतोय तसतसे गरिबापुढे जगावे कसे, असा प्रश्न गडद होतोय.
हातावर पोट असलेल्या मजुरांना अशा काळात एकवेळच्या भाकरीची भ्रांत पडली आहे. अशा वेळी कुणी अन्नधान्य घरपोच दिले तर गरजवंताला ती मदत लाखमोलाची ठरत आहे.