पशुसंवर्धन विभागाची नियोजनास सुरुवात
कर्जत ः बातमीदार
पर्यटनस्थळ माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्यामुळे येथील एकमेव वाहन असलेल्या घोड्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने येऊन पाहणी करून नियोजनास सुरुवात केली आहे.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण माथेरान हे 17 मार्चपासून बंद आहे. त्यामुळे घोडेसुद्धा आपल्या तबेल्यात उभे आहेत. माथेरानमध्ये 462 प्रवासी घोडे असून 200 मालवाहू घोडे आहेत. त्यांना विकार जडू नये यासाठी रायगड जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाकडून घोड्यांची आरोग्य तपासणी मंगळवारी (दि. 2) येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 येथे सकाळी 10 वाजल्यापासून केली जाणार आहे. यासाठी पशु वैद्यकीय अधिकार्यांचे एक पथक शनिवारी माथेरानमध्ये दाखल झाले होते. कोविड 19च्या पार्श्वभूमीवर कुठलाही गोंधळ उडू नये यासाठी घोडेवाल्यांची गर्दी न होता सोशल डिस्टन्सिंग पाळून तसेच सॅनिटायझरचा वापर वारंवार होईल याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक घोड्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून ही तपासणी केली जाणार आहे. यासाठी या पथकाने नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी यांची भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
याबाबत आशाताई कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना यांनी आमचे घोडे दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस तबेल्यात उभे आहेत. त्यामुळे घोड्यांना आजार जडू शकतात. कोविड 19मुळे आमचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आमची रोजीरोटी मिळविण्याचे साधन घोडा असून तो सुरक्षित असावा यासाठी हे तपासणी शिबिर उपयुक्त ठरणार आहे. यासाठी रायगड जिल्हा पशु संवर्धन विभागाचे डॉ. सुभाष म्हस्के, डॉ. बी. के. आर्ले यांचे विशेष आभार मानले आहेत.