कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्याला मागील आठवड्यात कोरोनाने विळखा घातला होता. त्यामुळे सतर्क झालेल्या प्रशासनाला सलग तीन दिवस मोठा दिलासा मिळाला असून या दरम्यान केवळ एक नवीन रुग्ण आढळून आला आहे. तर तालुक्यातील तब्बल नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना वर मात केली असून आजच्या तारखेला 17 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कर्जत तालुक्यातील शहरी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मे महिन्याच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.त्यात एकट्या कर्जत शहरात 10, तर माथेरान शहरात 6 रुग्ण आहेत.तर ग्रामीण भागात 12 रुग्ण होते. सोमवारपर्यंत 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे पनवेल, कळंबोली येथील एमजीएम रुग्णालय आणि इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर एकूण 28 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे कोरोना वर मात करून घरी परतले आहेत. तर दोन वयोवृद्ध रुग्णांना कोरोना सह अन्य व्याधी त्यांना असल्याने त्यांचे बळी गेले आहेत. मात्र मागील तीन दिवसात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कर्जत तालुक्यात आढळून आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.कर्जत शहरातील सुयोगनगर येथे शेवटचा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.
उरणमध्ये आणखी तिघे बाधित
उरण : उरण तालुक्यातील सोमवारी (दि. 1) नागाव मधील 7 वर्षीय व्यक्ती एक, सोनारी येथील 60 वर्षीय पुरुष, जेएनपीटी टाऊनशिप येथील 47 वर्षीय महिला कोरोना पोझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. त्यास कामोठे एमजीएम येथे उपचार साठी ठेवण्यात आले आहेत.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 160 झाली आहे. त्यातील 134 बरे झालेले असून त्यांना डिस्चार देण्यात आला आहे . फक्त 25 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आज पर्यंत 1 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यु झाला आहे.
माणगावात एक नवीन रुग्ण
माणगाव : तालुक्यातील 18 गावांमध्ये एकूण 42 कोरोना रुग्ण आतापर्यंत आढळले असून त्यापैकी आठ रुग्ण पूर्णपणे ठणठणीत बरे होऊन घरी गेले असून तालुक्यातील रुद्रवली गावातील एक नवीन पुरुष रुग्णाचा रिपोर्ट रविवारी (दि.31) पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली. आता तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या 34 असून त्यांच्यावर विविध कोविड 19 रुग्णालयातून औषधोपचार सुरु आहे.
महाडमध्ये नवजात बालकासह एकाला लागण
महाड : प्रतिनिधी – महाड मधील एका खाजगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, तर ग्रामीण भागातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
तालुक्यातील डॉ. कोल्हे नर्सिंग होममध्ये जनमलेल्या बाळाला हृदय विकाराचा त्रास होत असल्याने त्याला ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. या वेळी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीमध्ये बालकास कोरोना झाल्याचे समजले. मात्र बालकाच्या आईची टेस्ट निगेटिव्ह आल्याने महाड मध्ये या कोरोना लागण बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.