Breaking News

पनवेल मनपाचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नागरिकांची होणार दुर्गंधीपासून मुक्तता

पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता दुर्गंधीपासून मुक्तता होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 4) प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर उपस्थित होते. या सभेत महापालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांतील गाळ काढून त्यांची साफसफाई करण्याच्या आवश्यक मशिनरीसह मनुष्यबळ पुरवण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता पनवेलमध्ये मलनिस्सारण वाहिन्या तुंबण्याचे प्रमाण कमी होऊन पनवेल स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होईल, असा विश्वास प्रवीण पाटील यांनी व्यक्त केला. याशिवाय शौचालये दुरुस्तीला परवानगी देण्यात आली. नाट्यगृहातील कामांनाही मंजुरी देण्यात आली. फॉगिंग मशिन, त्यासाठी लागणारे रसायन खरेदी, कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य, वडाळे तलाव सुशोभीकरणासही मंजुरी देण्यात आली. कोरोना रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी 13 लाख 71 हजार रुपये खर्चासही या वेळी मंजुरी देण्यात आली.
पनवेल महापालिका हद्दीतील 14 एमएलडी क्षमतेच्या मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राची नगरपालिका असताना दिलेल्या कामाची मुदत संपूनही दोन वर्षे नवीन ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्याबाबत मांडलेल्या प्रस्तावाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी विरोध करून आजपर्यंत प्रशासनाने निविदा का काढली नव्हती, त्याला जबाबदार कोण याची माहिती देऊन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची तसेच हा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिल्याने प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला. याशिवाय भूखंड क्रमांक 508 आणि 520 खाडीच्या बाजूने रिटर्निंग वॉल  बांधण्याच्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली नाही.

परिसरात निसर्ग चक्रीवादळामुळे किती जीवित आणि वित्तहानी झाली याबद्दल माहिती जाहीर करावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य तसेच इतर सेवासुविधांसाठी महापालिकेची संबंधित व्यवस्था सुसज्ज ठेवावी.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply