Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विजयाची मुहूर्तमेढ रोवली -बारणे

पनवेल ः प्रतिनिधी

मावळचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयानंतर खारघर येथे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. खासदार बारणे यांच्या स्वागतासाठी विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे विशेष आभार मानले.

पवार कुटुंबाने आजवर जरी पराभव पहिला नसला तरीही माझ्या आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून पार्थ पवार यांचा झालेला पराभव हा केवळ पार्थ व आघाडीचा नसून संपूर्ण पवार कुटुंबाचा असल्याचे मत बारणे यांनी व्यक्त केले. शिवाय अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा मतदारांनी ठोकरला आणि पवारांच्या घराणेशाहीला नाकारून गेल्या पाच वर्षांत मी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मला पुन्हा एकदा निवडून देण्याचे काम मावळच्या जनतेने केल्याचे बारणे म्हणाले. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित विजयी सभेत ते बोलत होते.

खरंतर पवार कुटुंबाचा मावळ मतदारसंघात तिळमात्रही संबंध नव्हता, परंतु राज्यासह देशभरात जमवलेला भ्रष्टाचाराचा पैसा मावळ मतदारसंघात वाटण्याचे काम सुरू होते, मात्र येथील सुजाण जनतेने पैशांच्या आमिषाला बळी न पडता हा भ्रष्टाचाराचा पैसा ठोकरला व विकासाला मत देत मोदींच्या झंझावाताला तसेच उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मला विजयी केल्याचे प्रतिपादन खासदार बारणे यांनी केले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची वाढती लोकप्रियता व दांडगा जनसंपर्क या एकत्रिकरणातून पनवेल विधानसभा क्षेत्रात मताधिक्य मिळवू शकलो. त्यामुळे विजयाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम रामशेठ ठाकूरसाहेबांनी केल्याबद्दल खासदार बारणे यांनी ऋण व्यक्त केले.

तसेच मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपचे पाच आमदार, पिंपरी-चिंचवड व मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व सुजाण मतदारांनी दोन लाखांहून अधिक विक्रमी मताधिक्य देऊन मला विजयी केले. त्यामुळे कोणा एकाला श्रेय देण्यापेक्षा युतीतील सर्व घटकांचा व शिवसेना-भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय असल्याचे बारणे यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात उरण येथील जेएनपीटी पोर्ट, आंतरराष्ट्रीय विमानतळ या संपूर्ण परिसरातील रस्त्याचे जाळे तसेच रेल्वेचे जे प्रलंबित प्रश्न असतील ते सर्वच मार्गी लावण्याचे काम आगामी काळात लवकरच करेन, असे आश्वासनही खासदार श्रीरंग बारणे यांनी या वेळी दिले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply