Breaking News

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गुरुवारी (दि. 4) येथे केली. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर गुरुवारी रायगड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सकाळी जिल्हाधिकरी कार्यालयात अधिकार्‍यांची बैठक घेऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,  आमदार रमेश पाटील, दक्षिण रायगड जिल्हा भाजप अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, परशुराम म्हात्रे त्यांच्या समवेत होते. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करून शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहचवा, असे आदेश विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या वेळी संबंधितांना दिले.
वीजपुरवठा, संपर्क यंत्रणा पूर्ववत करण्याचे आव्हान
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात शासकीय व खासगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या संकटात दोन जणांना प्राण गमवावे लागले. विजेचे हजारो खांब पडल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठाही खंडित आहे. दूरसंचार यंत्रणा कोलमडली आहे. वीजपुरवठा व संपर्क पूर्ववत करणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. यासाठी राज्य सरकारकडून जिल्ह्याबाहेरून अतिरिक्त कर्मचारी मागवावे लागणार आहेत.
निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा रायगड जिल्ह्याला बसला. यात श्रीवर्धन, मुरूड, रोहा, माणगाव, म्हसळा, तळा, अलिबाग, पेण, पाली या तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले. घरांची छपरे उडाली, तर कच्ची घरे कोसळली. आंबा, काजू, सुपारी बागायतदारांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात उमटे येथे विजेचा खांब पडून एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात भिंत अंगावर पडून एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या वादळाचा सर्वाधिक फटका वीज मंडळाला बसला. विजेचे हजारो खांब पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा खंडित झाला. हे खांब उभे करून संपर्क सेवा सुरू करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमणावर मनुष्यबळ लागणार आहे. जिल्ह्यातील मनुष्यबळ अपुरे पडणार असून राज्य शासनाला दुसर्‍या जिल्ह्यातून मनुष्यबळ मागवावे लागणार आहे. निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यात धडकणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती. कच्च्या घरांमध्ये राहणार्‍या 13 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारी जीवितहानी टळली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply