सभागृह नेते परेश ठाकूर यांचा पुढाकार
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेची व्यवस्था पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे सुसज्ज व्हावी यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पुढाकार घेतला असून, नगरसेवकांना आपल्या विभागात कोणती कामे महापालिकेने आणि सिडकोने करणे आवश्यक आहेत याची यादी सादर करण्यास शुक्रवारी (दि. 5) महापौर दालनात झालेल्या बैठकीत सांगितले.
या बैठकीस महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम पाटील, दर्शना भोईर उपस्थित होते.
पनवेल महापालिका क्षेत्रात मागील वर्षी पावसाळ्यात अनेक वेळा पाणी तुंबल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे नुकसान झाले होते. यंदा पुन्हा तशी परिस्थिती उदभवू नये यासाठी महापालिकेने आणि सिडकोने पावसाळ्यापूर्वी कोणती कामे केली पाहिजेत याबद्दल प्रभाग अध्यक्ष आणि नगरसेवकांजवळ चर्चा करून त्यांना कामांची यादी देण्यास बैठकीत सांगण्यात आले. सिडकोच्या कामांची यादी आमदारांकडे देण्यात येणार आहे, तर महापालिकेच्या कामांबाबत आयुक्तांजवळ चर्चा केली जाणार आहे.
या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शिक्षण अधिकार्यांकडून महापालिकेच्या 10 आणि जिल्हा परिषदेच्या महापालिका हद्दीत आलेल्या 50 शाळांची माहिती घेऊन तेथे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी काय व्यवस्था आहे, स्वच्छतागृहांची काय अवस्था आहे याबाबत स्थानिक नगरसेवकांसोबत पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले. त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी तातडीने कामे करून घेण्याबाबत आयुक्तांजवळ चर्चा करून ती कामे पूर्ण करून घेण्याचे ठरले. मध्यान्ह भोजनाबाबतही माहिती घेण्यात आली.
महापालिका हद्दीत आलेल्या 50 शाळा ताब्यात देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे महापौरांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. महापौर या जिल्हा परिषदेला शाळा ताब्यात देण्यासाठी पुन्हा पत्र देणार आहेत. या शाळांची जबाबदारी आमच्याकडे येणार असल्याने त्यांची आजची स्थिती काय आहे व तेथे कोणते काम करायला पाहिजे याची माहिती घेण्यास सांगितले आहे.
–परेश ठाकूर, सभागृह नेते, पनवेल महानगरपालिका