अकोला : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडत असल्याची घोषणा शनिवारी (दि. 27) केली. अकोले येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
देशात 2014च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय झाला अन् राजकारणाचे चित्रच पालटून गेले. या मोदी लाटेने 2019मध्ये त्सुनामीचे रूप घेतले. तीत विरोधक अक्षरशः वाहून गेले. हा प्रभाव कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाले, तरी विजयाची शाश्वती नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते पक्षांतर करीत आहेत.
पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. राष्ट्रवादीतील 20 नेत्यांनी पक्षप्रवेश केला. यामध्ये बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, राहुल कूल, किसन कथोरे, कपिल पाटील, सचिन अहिर, लक्ष्मण ढोबळे, निवेदिता माने, विनय कोरे, संजय सावकारे, प्रसाद लाड, लक्ष्मण जगताप, बाबासाहेब देशमुख, नरेंद्र पाटील, प्रशांत परिचारक, सुरेश धस, विजयकुमार गावित, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते-पाटील, पांडुरंग बरोरा यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांची यादीदेखील मोठी आहे. यामध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे.