पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने पनवेल व आजूबाजूच्या परिसरातून मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कर्मचार्यांची अर्थात कोरोना योद्ध्यांची कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेला पनवेल परिसरातील अनेक नागरिकांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना योद्ध्यांची त्यांच्या कामाच्या ठिकाणीच रहाण्याची सोय करावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात केलेली जनहित याचिका योग्य आहे. पनवेल परिसरात आढळून येणारे बहुतांश रुग्ण हे मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे नागरिक आहेत. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केलेली मागणी योग्यच असल्याने पनवेलकरांच्या सुरक्षिततेसाठी त्याला माझा पाठिंबा आहे.
-प्रीती खानविलकर, अध्यक्ष, पनवेल महिला आघाडी, मनसे
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. मुंबईला अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या कोरोना सैनिकांना अधिक प्रमाणात संसर्ग झाल्याचे दिसत आहे. कुटुंबीयांनाही त्यांच्यापासून संसर्ग होत असल्याने या सैनिकांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी ही आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी न्याय्य आहे. योद्ध्याचे ध्येय विजय मिळवणे असते. हा विजय मिळवताना कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी सैनिकाने त्यांच्यापासून दूर राहाण्यात काही चूक नाही.
-रवींद्र पवार, माजी सैनिक
अत्यावश्यक सेवेत कामाला जाणार्यांच्या कुटुंबीयांनी माझ्याजवळ बोलताना घरातील माणूस परत घरी येईपर्यंत धाकधूक वाटत असते. घरात आल्यावरही त्यांच्या आणि आमच्या मनात भीती असते. त्यांची जर कामाच्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय झाली, तर त्यांनी कामाच्या ठिकाणी राहण्यास आमची हरकत नसेल. त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते चांगले असेल असे त्यांना वाटते. त्यांचे अनुभव ऐकून आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी योग्य आहे असे मला वाटते.
-नीलम आंधळे, अध्यक्ष, दिशा महिला मंच, कामोठे
खारघर, कामोठे, कळंबोली या पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने आढळत आहेत. या रुग्णांमध्ये आपल्या आजूबाजूला राहणार्या आणि मुंबई, नवी मुंबई येथे अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्या नागरिकांचा मोठ्या प्रामाणात समावेश असल्याने सामान्य माणसाला भीती वाटत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि शेजार्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची कामाच्या ठिकाणीच रहाण्याची सोय करावी ही आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी रास्त आहे.
-मनीषा भोयर, सामान्य गृहिणी, खारघर
कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे संपूर्ण सोसायटीला क्वारंटाइन केले जाते. बहुतांश सोसायट्यांमध्ये मुंबईला कामाला जाणार्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. आज आमच्या मोरया गार्डन सोसायटीत 333 फ्लॅट्स आहेत. त्यातील सर्वांना क्वारंटाइन केल्याने अनेकांची अडचण झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यावश्यक सेवेतील सेवाकर्मींची तात्पुरती कामाच्या ठिकाणी राहण्याची सोय करा ही केलेली मागणी बरोबर आहे.
-रमेश धामणे, खजिनदार, मोरया गार्डन सोसायटी, उसर्ली