पनवेल ः प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 70व्या परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून प्रथमच रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून या विद्यार्थ्यांना श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली. सोमवारी (दि. 17) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांना धनादेश देण्यात आला.
अवकाश संशोधन संस्था ही अमेरिका (नासा), भारत (इस्रो), चीन, जपान, रशिया व युरोपियन देश मिळून निर्माण झालेली एक जागतिक संशोधन संस्था आहे. यंदा या संस्थेने आयोजित केलेल्या 70व्या परिषदेत इम्पिरियल सायंटिफिक असोसिएशन पेण रायगड या संस्थेमार्फत पाठविलेल्या दोन शोधनिबंधांची निवड झाली आहे. ते शोधनिबंध सादर करण्यासाठी भक्ती मिठाग्री, नमस्वी पाटील, प्रज्ञेश म्हात्रे, हर्षवर्धन देशपांडे, वृषाली पालांडे, रिंकेश कुरकुरे व कृपाल दाबाडे या रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना परिषदेने आमंत्रित केले आहे. ही परिषद 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2019 यादरम्यान अमेरिका येथे होणार आहे. त्याकरिता लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत या विद्यार्थ्यांना केली आहे. या वेळी विद्यार्थी, तसेच शशिकांत मिठाग्री, मंडळाचे कार्यालयीन सचिव अनिल कोळी
उपस्थित होते.