Breaking News

नवी मुंबईत आढळले 115 कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत रविवारी (दि. 7) कोरोनाचे 115 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 41 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. रविवारी एकाचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या 89  झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 886 व्यक्ती पॉझिटिव्ह असून; बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 718 झाली आहे. त्यामुळे बरे होणार्‍या व्यक्तींचे प्रमाण 60 टक्क्यांवर पोहोचले असून ही देखील तितकीच समाधानाची बाबा समजली जात आहे. सद्य स्थितीत 1079 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 5, नेरुळ 15, वाशी 17, तुर्भे 28, कोपरखैरणे 17, घणसोली 9, ऐरोली 21, दिघा 3 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. एपीएमसी मार्केट सुरू असल्याचा फटका बसू लागला असून कोपरखैरणे भागात कोरोनाने कहर माजवला आहे. तर तुर्भे झोपडपट्टी भाग हा सर्वात डेंजर झोन बनला असून दाटीवाटीने वसलेल्या घरांमुळे याभागात अवघड स्थिती बनली असल्याने नागरिक चिंतातुर आहेत. तज्ञांकडून पावसाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गावठाण व झोपडपट्टी चिंता वाढत आहे.

कोकणावरील संकटाबाबत मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबई : प्रतिनिधी

मध्य कोकणावर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटाबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विरेंद्र पवार, विनोद साबळे यांनी हे निवेदन दिले आहे.

मध्य कोकणात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली, खेड, माणगाव, मंडणगड ते अलिबागपर्यंतचा सर्व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. परिसरातील आंबा, काजू व नारळाची लाखो झाडे उन्मळून पडलेली आहेत. त्याचबरोबर जवळपास सर्वच घरांचे पत्रे उडून गेले आहेत. सर्व तालुक्यांचा वीजपुरवठा खंडित असून त्यामुळे पिण्याचे पाणीही उपलब्ध होत नाही. या संकटात भर म्हणजे स्थानिक पातळीवर व्यवसाय करणारे महाभाग नफेखोरी करून पत्रे, ताडपत्री तसेच अन्य जीवन उपयोगी साहित्याची चार ते पाच पटीने विक्री करीत आहेत. या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चातर्फे शासनाने त्वरित या बाबींकडे लक्ष देऊन अशाप्रकारे चढ्या भावाने ताडपत्री व पत्र्यांची विक्री करत असलेल्या व्यापार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आत्मनिर्भर विश्वभारत वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनामुळे हळूहळू जनजीवन पूर्ववत होत असले तरी आगामी कालखंड हा संघर्षपूर्ण असणार आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या स्थितीत सक्षम राहाण्यासाठी आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला आहे. या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भरतेचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून खारघरमधील संस्थांनी एकत्र येत आत्मनिर्भर विश्व भारत वेबिनारचे आयोजन शनिवारी (दि. 6) केले होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कॉर्पोरेट हेल्थ इंटरनॅशनल, सिटी बेल लाईव्ह, वेब प्रिंट सोल्युशन्स, सोसायटी किंगडम आणि एन्जॉय को वर्किंग स्पेस यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनारचे मुख्य आयोजक तथा सुप्रसिद्ध साऊंड थेरपिस्ट वैभव सोनटक्के यांनी याबाबत बोलताना सांगितले की, कोरोनामुळे आव्हानात्मक कालखंड हा नंतर असणार आहे. यादरम्यान आपल्या सगळ्यांनाच काहीतरी वेगळे करून दाखवायची गरज निर्माण झाली आहे. या सार्‍याचा परिचय वेबिनारच्या माध्यमातून सहभागी होणार्‍या नागरिकांना करून देण्यात आला. सिटी बेल लाईव्हचे संपादक मंदार दोंदे यांनी आगामी कालखंडात पत्रकारिता क्षेत्रात निर्माण होणार्‍या संधींवर प्रकाश टाकला.

मुरूड अत्याचारप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

मुरूड : प्रतिनिधी

एकदरा ग्रामपंचायतीच्या शेजारी खोरा बंदर येथे पाके यांच्या फार्म हाऊसवर मूळच्या उत्तर प्रदेशात राहणार्‍या एका मजुराच्या आठ वर्षीय लहान मुलीशी मालक नारायण पाके याने लैंगिक चाळे केले होते. मुरूड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलीस कोठडी पुन्हा चार दिवसांनी वाढविण्यात आली.

ज्या वेळी हा कामगार घरात उपस्थित नसे त्या वेळी फार्महाऊस मालक मुलीसोबत लैगिक चाळे करीत असे. न्यायालयात मुरूड पोलिसांनी आरोपीविरुद्ध असणारे सबळ पुरावे सादर करून कोठडीचा कालावधी वाढवून घेतला. याबाबतचा तपास डीवायएसपी सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड पोलीस करीत आहेत.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply