पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात तिबोटी खंड्या (ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर) पक्ष्यांच्या जोडीचे आगमन झाले असून अभयारण्यातील हे मुख्य आकर्षण ठरत आहे. परंतु लॉकडाऊनमुळे अभयारण्य बंद असल्याकारणाने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांना या पक्ष्याचे दर्शन घेता येणार नाही. पावसाची चाहूल लागल्यानंतर साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई आणि आसपासच्या हरितक्षेत्रात आकर्षक अशा तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या आगमनाला सुरूवात होते. कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. याठिकाणी हे पक्षी दरवर्षी काही संख्येने प्रजननाकरीता दाखल होतात.
पक्षीप्रेमी-पर्यटकांना प्रवेशबंदी
कर्नाळा अभयारण्य या पक्ष्याचे नंदनवन आहे. याठिकाणी हे पक्षी दरवर्षी काही संख्येने प्रजननाकरीता दाखल होतात. तिबोटी खंड्या पक्ष्यांच्या प्रजनन प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वनविभागाच्या अधिकार्यांनी पक्षी निरीक्षण, पर्यटक तसेच फोटोग्राफीसाठी बंदी घातली आहे. अनायसे संचारबंदी असल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यटकांसाठी अभयारण्य बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही आहेत पक्ष्याची वैशिष्ट्ये
* या पक्ष्याच्या अंगावर जांभळा, गुलाबी, निळा, काळा, पांढरा या रंगांच्या वेगवेगळ्या छटा असतात. नारंगी पिवळे पोट आणि लाल रंगाची लांब चोच असते.
* त्याची लांबी साधारण 13 सेमी असते.
* मातीमध्ये बीळ खणून त्यामध्ये हा पक्षी घरटे तयार करतो. 4 सेमी तोंड असलेले त्याचे बळी मातीमध्ये सुमारे 2 फुट आतवर गेलेले असते.
* छोटे किटक, पाल, मासे हे त्याचे खाद्य आहे.
* प्रजननाच्या कालावधीत जोडी जुळल्यानंतर या पक्ष्यांच्या नर-मादी मिळून घरटे खोदण्याचे काम करतात.
* अंडी उडविण्याची प्रक्रिया नर-मादी मिळून करतात. सतरा दिवसांच्या अंडी उबविण्याच्या प्रक्रियेनंतर पुढील तीन महिने पिल्लांना वाढविण्याचे काम केले जाते.