पनवेल ः वार्ताहर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले होते. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद केली होती. परिणामी शासकीय महसुलात प्रचंड तूट होत असल्याने अखेर शासनाने कर प्राप्तीसाठी महसूल मिळणारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात मद्यविक्री ऑनलाइन किंवा व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली, मात्र पनवेलमधील काही वाइन शॉप मालक दुकानाच्या परिसरातच तसेच क्वचित प्रसंगी जादा दराने मद्यविक्री करताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने शासनाच्या नियमांना बगल देणार्या अशा वाइन शॉप चालकांवर कारवाई करून त्यांचा परवाना त्वरित रद्द करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, रुग्णसंख्या आटोक्यात यावी, मात्र हे करीत असताना काही महसूल देणारी दुकाने सुरू करण्यास मुभा मिळावी या धोरणाने शासनाने अटी-शर्ती आबाधित ठेवून मद्यविक्रीकरिता परवानगी दिली. ही परवानगी देताना दुकानात गर्दी होऊ नये याकरिता मद्य दुकानात थेट विक्री करता येणार नसून ती ऑनलाइन पद्धतीने अथवा व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे घरपोच करण्याची अट शासनाने मद्यविक्री दुकानदारांना देऊन तसा आदेश पारित केला आहे.
असे असतानाही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आम्हाला परवानगी मिळाली आहे. आता आम्ही पाहिजे तसे करू या आविर्भावात काही वाइन शॉप चालकांकडून मद्यविक्री सुरू असून दुकानाबाहेरच मद्यविक्री केली जात आहे. बाहेरून शटर बंद असल्याचे भासवून दुकानासमोर आपली माणसे ठेवून आलेल्या ग्राहकाला दुकानाबाहेरच 200 ते 300 रुपये डिलिव्हरी चार्जच्या नावाखाली दुकानाबाहेरच मद्याची विक्री करण्यात येत आहे. ग्राहकाला दारू घरी मागवताना अडचणी येत असल्याने व दारू कधी येईल याची वाट न बघता 200 ते 300 रुपये जादा देऊन लगेच मिळते म्हणून काही ग्राहकही चढ्या भावाने मद्य विकत घेत आहेत.