उरण : प्रतिनिधी
जून महिन्याच्या आगमनातच दोन दिवसातील निसर्ग चक्रीवादळाने उरण तालुक्यातील घरांची छप्परे, विद्युत पोल व रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी वृक्षे उन्मळून पडल्याने अनेकांचे अतोनात नुकसान झाले असून, सार्यांचेच जनजीवन विसखळीत केले आहे. मात्र वादळानंतर पावसाने दिलेल्या उघाडीमुळे तालुक्यातील शेतकर्यांनी भाताच्या पेरणीची कामे पूर्णत्वास नेली आहेत. निसर्ग चक्रीवादळानंतर पावसाने उघाडी दिल्याने आणि ऊन वार्याने चक्रीवादळाबरोबर झालेल्या जोरदार पावसाचे पाणी जमिनीखाली जाऊन शेतजमिनी पेरणी करण्यालायक भुसभुशीत झाले आहे. मागील चार दिवसात भात पेरणीचे काम पूर्णत्वास गेल्याने येथील शेतकर्यांना भात पेरणीची लागलेली चिंता मिटली असल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे.