पनवेल : प्रतिनिधी
लंडनमधील भारतीयांच्या सेवा डे या नोंदणीकृत विश्वस्त संस्थेने इंग्लंडमध्ये एनएचएसच्या रुग्णालयात काम करणार्या कोरोना योद्ध्यांना जेवण पुरवून सेवाभावी वृत्तीचे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले.
मार्चच्या उत्तरार्धात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले तेव्हा यूके मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यावेळी सेवा डे या इंग्लंडमध्ये नोंदणीकृत भारतीयांच्या विश्वस्त संस्थेला माहिती मिळाली की कोरोना विषाणूग्रस्त रूग्णांची काळजी घेणारे डॉक्टर आणि परिचारिका यांना मदतीची आवश्यकता आहे. त्यांना चांगले पौष्टिक जेवण मिळणे गरजेचे आहे. सेवा डेच्या पदाधिकार्यांनी पश्चिम लंडनमधील वेस्ट मिडलसेक्स आणि हिलिंग्डन रुग्णालय या दोन स्थानिक रुग्णालयात संपर्क साधला असता त्यांना पौष्टिक जेवणाची आवश्यकत्ता असल्याचे समजले. लंडनच्या पश्चिमेस हॉन्स्लो, स्लो, रिडिंग, बेसिंगस्टोक आणि इतर शहरांमध्ये सेवा डेने संपर्क साधून आपल्या स्वयंसेवकांना एकत्र केले आणि स्लाव्हमधील हिंदू मंदिरात सेवा स्वयंपाकघर सुरु करण्याचे ठरले. स्लाव्ह हिंदू मंदिरानेही ह्या उपक्रमास त्वरित संम्मती दिली व जेवण बनवण्यासाठी लागणारे आपले साहित्य व धान्य भांडार खुले केले. स्थानिक हिंदू समुदायाच्या स्वयंसेवकांनी पीपीई आणि सामाजिक अंतर पाळून मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करून 20 ते 25 हजार कोरोंना योद्ध्यांना जेवण दिले. असंरक्षित कुटुंबांसाठी खाद्यपदार्थाचे पार्सल दिले आहेत. विद्यापीठे व वसतिगृह बंद झाल्यावर अनेक भारतीय विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांच्याकडे राहण्यासाठी जागा आणि खाण्यासाठी अन्न ही नव्हते. इंडियन नॅशनल स्टूडंट्स असोसिएशनने सेवा डे बरोबर संपर्क साधल्यावर या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजन उपलब्ध करुन देण्यात आले. सेवा डे स्वयंसेवकांनी फार्मासिस्टला एप्रिल आणि मे 2020 मधील लॉकडाऊन दरम्यान अत्यावशक औषधे असंरक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली. अनेकांच्या मदतीमुळे आम्हाला ही महान सेवा करणे शक्य झाल्याचे समन्वयक सुहास माढेकर सांगतात.