अलिबाग : प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या धक्क्यातून रायगडकर हळूहळू बाहेर पडतोय. स्वतःला सावरतोय. त्याने आता आपले व्यवहार सुरु केले आहेत. बळीराजा देखील कामाला लागलाय. खोळंबलेली शेतीची कामे सुरु झाली आहेत. जिल्ह्यातील भाताच्या पेरण्याची लगबग सुरु झाली आहेत.
जिल्ह्यात साधारण एक लाख पाच हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. यंदा लॉकडाऊनमुळे चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे आहेत. त्यामुळे यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
पाऊस सुरु झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हयात चांगला पाऊस झाला आहे. धूळ पेरणीची कामे या आधीच पूर्ण झाली असून रोहू पद्धतीची पेरणी सुरू आहे.
लॉकडाऊनमुळे चाकरमानी गावाला गेल्याने यंदा जिल्ह्यात भातलागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेवून 20 हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे खताचा अतिरिक्त साठा करण्याच्या सूचना कंपन्यांना दिल्या आहेत. – पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी