नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईमध्ये दुकान उघडण्याच्या व निश्चित केल्या आहेत. त्यानुसार सकाळी 9 ते 5 अशी वेळ ठेवली आहे मात्र आता आपल्या नोकर्यांवर परतलेल्या नागरिकांनी सायंकाळी सुटल्यावर मात्र दुकाने बंद असल्यामुळे गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुकानांची वेळ बदलून सकाळी 9 ते रात्री 9 ठेवावी अशी मागणी वाढू लागली आहे.
सम विषम पद्धतीमुळे प्रत्येक दुकानदारास महिन्यातील 15 दिवस व्यवसाय करण्यासाठी मिळत आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मिशन बिगिन अगेन अर्थात पुन:श्च हरी ओम करताना महाराष्ट्राची कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा सुस्थितीत आणण्याची गरज आहे. दुसरीकडे व्यापारी वर्ग पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. मागील तीन महिन्याचे दुकानाचे भाडे, लाइट बिल व कामगारांचे पगार अशा असंख्य समस्या समोर आहेत. नवी मुंबईत सध्या दुकाने उघडण्याची दिलेली वेळ अपुरी पडू लागली आहे. सध्या अनलोकला सुरुवात झाली असल्याने नागरिक नोकरी व काम धंद्यांसाठी बाहेर पडू लागले आहेत. सकाळी लवकर घराबाहेर पडणारे नोकरदार सायंकाळी परत येत आहेत. मात्र घरी जाताना अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानेच बंद होत असल्याने नागरिकांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. तर व्यापार व व्यवसायाची महत्वाची वेळ चुकत असल्याने दुकानदार देखील मेटाकुटीला आले आहेत.
नवी मुंबईत सुरक्षिततेचा उपाय म्हणून एकीकडे किरकोळ दुकानदारांना नियमावली आखून देण्यात आलेली असली तरी प्रशासनाने डी-मार्ट तसेच अन्य सुपर मार्केट स्टोअर्स यांना वेगळा नियम लागू केला आहे का अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. हे स्टोअर्स लॉकडाऊन वेळेपासून सकाळी 8 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत उघडी राहत आहेत. किरकोळ दुकानदारांना हटकणारे पोलीस या सुपरमार्केटसमोर बंदोबस्त करत असूनही ही मार्केट उघडी ठेवली जात आहेत. त्यामुळे त्यांना कोणतीही भीती उरलेली नाही. मुळात या सुपरमार्केट अथवा डी मार्टमध्ये बाहेर दिसणारी सुरक्षितता आत मात्र पायदळी तुडवली जात असून हे मोठे स्टोअर्स कोरोनाची संक्रमण साखळी वाढवण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने दिलेल्या वेळेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.
नोकरीनिमित्त बाहेर पडलेला नोकरदारवर्ग ही सायंकाळी 6 ते 7 दरम्यानच्या घरी येत आहे. त्यासाठी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत वेळेत वाढ करून देण्याची गरज असून तरच दुकानदारांना चालना मिळून त्याचा परिणाम राज्याची तिजोरी भक्कम करण्यासाठी होणार आहे. पालिकेने याबाबत विचार करण्याची गरज आहे.
लहान सहान दुकानदार हे देशाच्या व राज्याच्या आर्थिक तिजोरीत भर टाकत असतात. मात्र या दुकानदारांना अनेक बंधने तर दुसरीकडे सामाजिक अंतराचे व सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणार्यांना खुली सूट यामुळे दुकानदारांत संभ्रमाचे वातावरण आहे. नागरिक आता नोकरीनिमित्त घराबाहेर पडू लागले असून दुकानांची वरील वाढवून ती 9 ते 9 करण्यात यावी. तर शहराला व राज्याला गती मिळेल. नोकरदार वर्गाचे सांयकाळी अत्यावश्यक सेवेच्या अनुपलब्धतेमुळे होणारे हाल कमी होतील व दुकानदारांना दिलासा मिळेल. तसेच समस्त व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा व संबंधित डिपार्टमेंटल स्टोअर्स च्या वेळेबाबतच्या आदेशाची प्रत संघटनेस मिळावी.
-प्रमोद जोशी, महासचिव, नवी मुंबई व्यापारी महासंघ