Breaking News

ओबीसी आरक्षणासाठी सत्ताधार्‍यांसोबत राहणार ; देवेंद्र फडणवीस यांचे भुजबळांना आश्वासन

मुंबई ः प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणासाठी आपण एकत्रितपणे काम करू. त्यात काही अडचण नाही. मी तुमच्यासोबत काम करेन. तुम्ही त्याचे नेतृत्व करा, असे आश्वासन राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांना दिले आहे. छगन भुजबळ यांनी गुरुवारी (दि. 15) देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले की, छगन भुजबळ ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मला भेटायला आले होते. त्यांनी इम्पेरिकल डेटा कसा गोळा करता येईल यासंबंधी माझे मत जाणून घेतले. या वेळी मी त्यांना मराठा आरक्षणावेळी कसा इम्पेरिकल डेटा गोळा केला व तो सुप्रीम कोर्टाने कसा वैध ठरवला याची माहिती दिली. तसेच त्यांनी पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्यात. आमच्याकडून पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासनही दिल्याचे फडणवीसांनी या वेळी सांगितले. सुप्रीम कोर्टाने कोरोनामुळे निवडणुकीच्या संदर्भातील अधिकार निवडणूक आयोगाला दिले आहेत. सध्याच्या निवडणुका आयोगाने पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, असे या वेळी फडणवीस म्हणाले. दरम्यान, काँग्रेसचे महागाईविरोधातील सायकल आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याची टीकाही या वेळी फडणवीस यांनी केली. राज्य सरकारच्या मनात असेल तर सरकार इंधन दरवाढीतून दिलासा देऊ शकते, असेही ते म्हणाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply