लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योगधंदे थांबले, बंद पडले. परंतु अगदी घरबसल्या मोबाइलवरून करता येणारा धंदा म्हणून लॉकडाऊनचा फायदा उठवत अनेक नवे लोक शेअर बाजारात आले. काही नशीब आजमावण्यासाठी तर काही निश्चित कमाईचे साधन म्हणून. शेअर बाजार म्हटले की दोन टोकाची मते पाहायला मिळतात, एक म्हणजे भरपूर कमाईचे साधन म्हणून तर दुसरीकडे याला जुगार म्हणून हिणवले जाते. खरे म्हणजे बाजार सर्वांसाठी सारखाच असतो. तर मग असे टोकाचे अनुभव कसे काय येतात? याचे ढोबळमानाने उत्तर म्हणजे शेअरबाजाराबद्दल गैरसमज.
शेअरबाजार ही काही जादूची छडी नव्हे, की कोणताही शेअर घेतला आणि पैसे दुप्पट-दसपट झाले, त्यासाठी खूप मोठा अभ्यास व श्रम लागतात हे समजूनच शेअर बाजाराकडे वळावे.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतः काय म्हणून बाजारात येत आहोत ते ठरवून त्याप्रमाणे त्याचे नियम पाळावेत, म्हणजे जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर शेअरबाजाराकडे गुंतवणुकीचे एक साधन म्हणून पाहिले पाहिजे तर जर तुम्ही ट्रेडर असाल तर शेअरबाजारासारखी भलीमोठी बाजारपेठ कोणती नाही कारण सुमारे साडेचार हजार कंपन्यांचा व्यवहार रोज याद्वारे चालू असतो. तर आज आपण पहिल्या पर्यायाकडे पाहू.
गुंतवणूक म्हटली की त्यासाठी वेळ दिलाच पाहिजे, कमीत कमी पाच वर्ष बँकेच्या एफडीमधील गुंतवणूक व शेअर बाजारातील गुंतवणूक यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. एफडीमधील परतावा ठराविक पण निश्चित असतो त्याउलट शेअर बाजारातील परतावा अनिश्चित असू शकतो, त्यामुळे आपण गुंतवणूक करीत असलेली गुंतवणुकीची रक्कम ही आपल्याला पुढील पाच वर्षांत न लागणारी रक्कमच असावी, ज्या रकमेवर वेळ पडल्यास नुकसान सोसण्याची देखील तयारी ठेवावी.
मुख्य मुद्दा जो अनेकजण दुर्लक्षित करतात तो म्हणजे शेअर खरेदीचा भाव जसा निश्चित, तसाच त्याच्या विक्रीचा भाव देखील निश्चित केला जावा. बाजारात गुंतवणूक करून त्यातून चांगला परतवा मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते परंतु प्रत्येकालाच ते जमते असे नाही कारण बाजारात गुंतवणूक करणे, ती सांभाळणे व योग्य वेळी त्यातून बाहेर पडणे ही कला फारच कमी लोकांना अवगत असते. कारण बाजारातील परिस्थतीनुसार आपले निर्णय झटपट बदलावे लागतात. सद्य परिस्थिती पाहता ’दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक’ म्हणून नफा होत असताना तो पदरात न पडून घेतल्यास निराशा पदरी पडू शकते,
शेअर खरेदी करताना पाळावयाच्या काही मूलभूत गोष्टी
1. सर्वप्रथम बाजार ओळखायला शिकणे म्हणजे, ग्राहकरुची, भारतीय अर्थव्यवस्था, सरकारी धोरणे, जागतिक अर्थव्यवस्था, इतर महत्वाच्या देशांच्या अर्थव्यवस्था व त्यातील घडामोडी, जागतिक व्यापार व्यवस्था, कच्च्या तेलाच्या किंमती, नैसर्गिक आपत्ति, युद्ध, इ. गोष्टी शेअरबाजारावर कधीही परिणाम करू शकतात आणि त्यामुळे शेअरबाजारातील गुंतवणुकीची शाश्वती नाही. तरी देखील मागील 40 वर्षांचा आढावा घेतल्यास यातून मिळणारा परतावा हा सर्वोत्तमच आहे, सुमारे 16% दसादशे.
2. कोणतीही गुंतवणूक करताना ती स्वतःच्या वाचवलेल्या पैशातूनच केली जावी ना की कर्ज काढून किंवा उसनवारीमधून. मग शेअरबाजारास देखील हा नियम लागू आहे.
3. कोणत्याही कंपनीच्या शेअरची खरेदी करताना त्या कंपनीची माहिती असणे गरजेचे आहे, जसे की त्या कंपनीच्या उत्पादनासाठी असलेली मागणी, त्या उत्पादनाची दीर्घकालीनता, कंपनीचे व्यवसाय करण्याचे स्वरूप, व्यवस्थापन व प्रवर्तक, कंपनीची आर्थिक स्थिती, आर्थिक व्यवहार व ताळेबंद. कारण शेअरचे भाव हे कंपनीच्या उत्पन्नाच्या आधीन असतात, म्हणजेच कंपन्यांचे आर्थिक निकाल हे बाजारावर परिणाम करतात.
4. शेअरचा भाव जास्त म्हणून तो शेअर महाग असे नाही तर पुस्तकी किंमत, आर्थिक गुणोत्तर, इ. बाबींवरून या गोष्टी ठरतात.
5. एकाच शेअरमध्ये सर्व पैसे न गुंतवणे.
6. लाभातून लोभात न जाणे किंवा परिस्थिती पाहून योग्य वेळी शेअर विकून टाकणे.
7. कोणाच्या तरी सांगण्यावरून शेअर्सची खरेदी न करता, स्वतः अभ्यास करून वर दिलेल्या गोष्टी तपासणे.
8. शेअरबाजारात नवख्या असणार्यांनी शेअर बाजार शिकेपर्यंत अनुभवी, विश्वासू गुंतवणूक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार करणे.
ऑल द बेस्ट.
सुपरशेअर – टीव्ही 18
मागील आठवड्यात रिलायंसच्या शेअरने नवीन उच्चांक गाठला आहे आणि त्याजबरोबर त्याच्याशी संबंधित भागीदारी असलेल्या इतर कंपन्यांचे देखील उखळ पांढरे झाले आहे. अशीच एक कंपनी आहे, टीव्ही 18.
रिलायन्स इंडस्ट्रीज ही या कंपनीची पेरेंट ऑर्गनायझेशन असून व्हायाकॉम 18, आयबीएन लोकमत, ईटीव्ही नेटवर्क सारख्या कंपन्या या कंपनीच्या उपकंपन्या आहेत. 2011 मध्ये कंपनीची कर्ज हाताबाहेर जाऊ लागल्यावर कंपनीचे सर्वेसर्वा राघव बहल यांनी भांडवलासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे दरवाजे ठोठावले आणि 2014 मध्ये आपल्या जिओ वायरलेस सामग्री वितरणात सामावून घेण्यासाठी रिलायन्स समूहाने नेटवर्क 18चा अधिकृत ताबा घेतला. टीव्ही 18 ब्रॉडकास्ट लिमिटेड ही मुंबईतील नेटवर्क 18 ग्रुपशी संबंधित एक भारतीय मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनी आहे. सध्या सीएनबीसी-टीव्ही 18, सीएनबीसी आवाज, सीएनबीसी बजार, सीएनएन न्यूज 18, कलर्स, कलर्स मराठी सारखे कलर्सचे सर्व प्रादेशिक चॅनल्स, एमटीव्ही, व्हीएच 1, हिस्टरी टिव्ही 18, निकोलोडियन, होमशॉप 18, इ. चॅनल्सचे प्रक्षेपणाचे हक्क व संचलन टिव्ही 18 कडे आहे. याव्यतिरिक्त कंपनी, मनीकंट्रोल डॉट कॉम, फर्स्ट पोस्ट, बुक माय शो यासारखी इंटरनेट आऊटलेट्स व फोर्ब्स इंडिया आणि ओव्हरड्राईव्ह सारखी मासिके देखील चालवते.
मागील दोन आठवड्यात या शेअरचे भाव 70% वाढले आहेत तर, तीन महिन्यांत भाव तीनपट वधारले आहेत, तरी पडझडीमध्ये हा शेअर खाली आल्यास त्यात दीर्घावधीसाठी एक चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.
तेजीची लाट कायम राहील?
मागील आठवड्यात भारतीय शेअरबाजार सुमारे पावणेतीन टक्के वधारला. सेन्सेक्स 950 अंशांनी तर निफ्टी 50 तब्बल 271 अंशांची उसळी मारून बंद झाले, यात रिलायन्सच्या शेअर्सचा मोठा वाटा होता. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या निर्यातीवरील उठवलेल्या बंदीने फार्मास्युटिकल कंपन्यांना चर्चेत ठेवले. 50 हजार कोटी रुपयांच्या गरीब कल्याण रोजगार अभियानाचा फायदा कृषी क्षेत्रास होईल, त्यामुळे त्यासंबंधित कंपनीचे शेअर्सना पुढील आठवड्यात उजळी येऊ शकेल. उदा. हिरोमोटोकॉर्प, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मारुति, खते, औषधी कंपन्या, एफएमसीजी, पाईप-मोटर्स अशा कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो. मागील आठवड्यात आलेली तेजीची लाट येत्या आठवड्यात देखील कायम राहील, असा अंदाज आहे. तांत्रिकदृष्ट्या निफ्टीने 50 व 100 दिवसांची चालत सरासरी ओलांडलेली असल्याने वरील उद्दिष्ट 10350-10400 असू शकते तर 10000 व 9850 ह्या लागलीच आधार पातळ्या म्हणून विचारात घेता येऊ शकतात.
इकडे लक्ष द्या
-कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सॅनिटायझरचा वापर वाढल्याने त्याचे उत्पादन करणार्या कंपन्यांची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे त्याचा साठा करू नका. जसा लागेल तसा घ्या, म्हणजे त्या स्पर्धेत कमी होणार्या किंमतींचा फायदा आपल्याला मिळेल.
-कोरोनाच्या संकटामुळे शेअर बाजार पडला होता, तो आता वर येतो आहे. त्यातही जीवनावश्यक वस्तू आणि शेतीसाठी लागणारी बियाणे, खते, रसायने यांचे उत्पादन करणार्या कंपन्यांच्या शेअरना शेअर पुढील काळात मागणी वाढणार आहे.
-प्रसाद ल. भावे, पुणे.
RamPrahar – The Panvel Daily Paper