पनवेल : वार्ताहर
गेल्या 31 वर्षांची परंपरा असलेल्या तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या पायोनियर विभागातील अभिनव युवक मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. अभिनव युवक मित्र मंडळाची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. या सभेत मंडळाचे अध्यक्ष रमेश चव्हाण, खजिनदार शैलेश कदम, सचिव अतिश जोशी, राहूल सावंत, महेश सरदेसाई, महेश ठेकेकर, प्रविण काणे, छगन परमार व चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी यंदाच्या कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे गणेशोत्सव 10 दिवसांऐवजी दिड दिवस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मूर्तीचे स्वरूप लहान असणार, घरटी वर्गणी जमा न करता कार्यकर्त्यांच्या यथोचित वर्गणीद्वारे उत्सव साजरा करणार, त्याचप्रमाणे मूर्तीची स्थापना दरवर्षीप्रमाणे मंडळाच्या मैदानात करण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले.
त्याबरोबर सरकार ज्याप्रमाणे पुढील नियमावली काढेल त्याप्रमाणे गणेशोत्सवाचे आयोजन व नियोजन करण्यात येईल, असे ठरविण्यात आले. अशाप्रकारे लाखो रूपयांची बचत करून पनवेलमधील इतर गणेशोत्सव मंडळांना आदर्श ठरेल असा निर्णय अभिनव युवक मित्र मंडळाने घेतल्याने त्यांचे सर्वच कौतुक होत आहे.