मुंबई : प्रतिनिधी
भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ जवळपास निश्चित असला तरी दोन जागांसाठी चुरशीची चढाओढ आहे. त्यादृष्टीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचे महत्त्व वाढले आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाकडे केवळ सात सामने आहेत आणि त्यातून उर्वरित जागांसाठीच्या खेळाडूंची निवड करायची आहे. सातत्याने होणार्या मालिका आणि त्याचा खेळाडूंवर पडणारा ताण लक्षात घेता ऑस्ट्रेलियाविरुद्ध काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. त्यामुळे या मालिकेत काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा व मोहम्मद शमी यांना विश्रांती मिळू शकते; तर कर्णधार विराट कोहली संघात कमबॅक करू शकतो. रिषभ पंत व लोकेश राहुल हेही या मालिकेत दिसू शकतात, तसेच रणजी करंडक स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करणारा उमेश यादवही वन डे संघात कमबॅक करू शकतो. रोहितला विश्रांती मिळणार असल्याने शिखर धवनवर सलामीची जबाबदारी असणार आहे. डावखुर्या फलंदाजाने मागील 8 सामन्यांत 34.71च्या सरासरीने 243 धावा केल्या आहेत आणि त्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या जोडीला लोकेश राहुल येऊ शकतो. मागील 14 महिने लोकेशला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्याने मागील वर्षात 3 वन डे सामन्यांत केवळ 69 धावा केल्या आहेत; तर 2019मध्ये भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने 55 धावा केल्या. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या कसोटीत त्याने 89 धावांची खेळी साकारली. विराट कोहली तिसर्या क्रमांकावर खेळणार आहे. भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर अंबाती रायुडूने दावा सांगितला असेल, तर त्याला आणखी संधी मिळणे आवश्यक आहे. महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मालिकेत पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2019मध्ये 121च्या सरासरीने 242 धावा चोपल्या आहेत. केदार जाधव व दिनेश कार्तिक यांच्यात चुरस असेल; तर सातव्या क्रमांकासाठी हार्दिक पांड्या ही पहिली पसंती असेल. या चर्चेच्या नावांव्यतिरिक्त रिषभ पंत व विजय शंकर यांचा मधल्या फळीसाठी विचार होऊ शकतो. शंकरला जाधव किंवा कार्तिकच्या जागी संघात स्थान मिळू शकते आणि तो ट्वेन्टी-20 मालिकेत खेळू शकतो. पंतला पहिल्या दोन-तीन सामन्यांसाठी आघाडीला संधी मिळू शकते. रवींद्र जडेजा हाही एक पर्याय चाचपडून पाहिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमरा या मालिकेतून कमबॅक करू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. त्याच वेळी मोहम्मद शमीला विश्रांती मिळू शकते. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भुवनेश्वर कुमारला आणखी काही सामने खेळण्याची आवश्यकता आहे. तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून उमेश आणि खलील अहमद यांची चर्चा आहे. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांचे स्थान पक्के आहे.