
पनवेल : प्रतिनिधी
नेहमी घरी आल्यावर धावत येऊन मिठी मारणारी माझी पाच वर्षाची मुलगी स्वरा मला दरवाजातच सांगते, आई तू लवकर आटोपून ये मला तुला गंमत दाखवायची आहे. त्याचवेळी माझ्या दोन वर्षांचा अर्णवला मी दिसू नये यासाठी घरातले दुसरीकडे गुंतवून ठेवतात. त्यावेळी एका आईला काय वेदना होत असतील याची जाणीव फक्त आईलाच समजेल, असे कळंबोली येथील नागरी आरोग्य केंद्रात काम करणार्या कोरोना योद्धा डॉ. आरती गुप्ते सांगत होत्या.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर नवीन पनवेल मध्ये रहाणार्या डॉ. आरती निरंजन गुप्ते यांची नेमणूक कळंबोली येथील नागरी आरोग्य केंद्रात झाली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून घरी आल्यावर स्वच्छ आंघोळ केल्या शिवाय मुलांजवळ जाता येत नाही. माझ्याकडे कोरोनाच्या रुग्णाच्या ट्रॅकिंगचे काम आहे. त्यामुळे सकाळी कामावर गेल्यावर शासनाकडून आलेल्या यादीतील रुग्णाच्या घरी फोन लावून त्यांची चौकशी करून त्यांना मार्गदर्शन करावे लागते. प्रसंगी रुग्णाच्या घरी ही जावे लागते. अनेक वेळा घरीच उपचार घेणार्या रुग्णाच्या घरी गेल्यावर तेथील परिस्थिती पाहून कुटुंबातील सदस्यांना त्यांचा मना विरुध्द नाईलाजाने क्वारंटाइन सेंटरमध्ये ही पाठवावे लागेत.
काही दिवसांपूर्वी एका आयटी क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीला कोरोना झाला त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या घरी गेल्यावर त्याची पत्नी, चार वर्षाची मुलगी आणि वृध्द आई ही घरात असल्याचे लक्षात आले. वृध्द आई आणि मुलीला संसर्ग होण्याचा धोका असल्याने त्याला सगळ्यांची टेस्ट करण्यास सांगितली. त्यामध्ये त्याची पत्नी पॉझिटिव्ह आली. मग मुलीला आणि आजीला वेगळे ठेवले. आजही ती व्यक्ती फोन करून तुमच्यामुळे माझी मुलगी आणि आई वाचले म्हणून मला धन्यवाद देते. तेव्हा आपल्या कामाचे चीज झाल्याचे समाधान मिळते. पोलीस कर्मचारी असलेले दोन भाऊ एकत्र राहत होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर घरीच उपचार घेत असताना त्यांच्या घरात असलेली छोटी मुलगी, वृध्द व्यक्ती पाहून त्यांची टेस्ट करायला लावली असता छोट्या मुलीचा ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिने कोरोनावर मात केली याचे समाधान वाटते.
पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यावर घरात जास्त काळजी घ्यावी लागते. स्वरा मोठी असल्याने तिला थोडी समज आहे. त्यामुळे ती मला पाहिल्यावर तू लवकर आटोप आणि ये असे सांगते पण जवळ आल्यावर आई कोरोना कधी संपेल म्हणून विचारतेच. अर्णवला अजून समजत नसल्याने माझे पती डॉ. समीर रामतीर्थकर, सासू, सासरे किंवा नणंद त्याला मी येण्याच्या वेळी दुसरीकडे गुंतवून ठेवतात. त्यावेळी मनाला वेदना होतात पण कोरोना विरुध्द लढण्यासाठी मला माझ्या कुटुंबाचे सहकार्य मिळत असल्यानेच मी हे सहन करू शकते असे सांगून त्यांनी प्रत्येक नागरिकाने स्वत: काळजी घेतली, लक्षणे दिसू लागताच वेळीच तपासणी करून उपचार घेतले तर गदीमांच्या भाषेत ’अंती विजयी ठरू’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.