मुंबई : प्रतिनिधी
मुंबईमध्ये रुग्णालयाबाहेर झालेले एक हजार मृत्यू का लपवण्यात आले आहेत? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. याबाबतचे एक पत्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. रुग्णालयाबाहेर झालेले, पण वेगवेगळ्या प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले एक हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आले नाहीत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
’माझ्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यांत असेही किमान एक हजार मृत्यू मुंबईत आहेत, ज्यांना अजूनही रेकॉर्डवर घेण्यात आलेले नाही. प्राथमिक संकलनातच आतापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृत्यूच्या संख्येत एकतर त्याचदिवशी किंवा फार तर 72 तासांत तशी नोंद होणे आवश्यक आहे. परंतू तीन महिने लोटले तरी मृत्यू रिपोर्ट न होता आणि ते लक्षात आल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून ते मृत्यू संख्येत अधिक करणे, ही अतिशय चुकीची रणनीती आहे’, असे फडणवीस या पत्रात
म्हणाले आहेत.
कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याची रणनिती ठरवण्यासाठी अचूक आकडेवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल, आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, यासाठी आग्रह धरा, अशी विनंती फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना 15 जूनला पत्र पाठवलं होतं. मुंबईत 950 मृत्यू कोरोनामुळे झाले असताना त्याची नोंद केली गेली नसल्याची तक्रार फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रात केली होती. यानंतर 16 जूनला मुंबईत 868 आणि राज्यात 350 असे एकूण 1328 मृत्यू दाखवण्यात आले.