नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना वीज बिले वाढीव दिलेली असल्याने ती तातडीने रद्द करुन मीटरप्रमाणे वीज बिले देण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
नगरसेविका दर्शना भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, संपूर्ण जगभरासह आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्याने केंद्र व राज्य शासनाने मागील दोन ते तीन महिने लॉकडाऊनची घोषणा केलेली होती. या कालावधी दरम्यान अनेक नागरिक आपआपल्या गावी गेलेले असल्याने त्यांनी वीज वापरलेली नसुनही त्यांना सर्वसाधारण बिलांच्याही जास्त दराने बिले आकारण्यात आलेली आहेत. तसेच सर्वसाधारण नागरिकांनाही जास्तीची बिले दिलेली असुन, हा सरळ-सरळ नागरिकांच्यावर अन्याय असुन, यामुळे नागरिकांची अर्थिक लुट होत आहे. आधीच लॉकडाऊनमुळे हाताला रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक चणचण भासत आहे. त्यात असे वाढीव वीज बिल महावितरणने दिल्याने दुहेरी संकट नागरिकांवर आले आहे. नागरिकांना मागील दोन ते तीन महिन्यांची आलेली वाढीव वीज बिले तातडीने रद्द करुन मीटरप्रमाणे या बिलांची वसुली करण्यात यावी, अशा मागणीचे पत्र महावितरणला दिले आहे.