मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुरूड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मुरूड अॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्याकरिता व्यापारीवर्ग, मेडिकल व इतर दुकानांत जाऊन तीन दिवस दुकाने बंद करून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली होती. त्या विनंतीनुसार मुरूड शहरातील व्यापारी, भाजीविक्रेेते व इतर दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केले. कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी मुरूड शहरातील अॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांंनी पुकारलेल्या तीन दिवसीय जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी मुरूड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्य बाजारपेठ, जुनी पेठ व इतर परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच रिक्षा, इतर वाहने बंद असल्याने सकाळी सात वाजल्यापासून गजबजणारी ठिकाणी ओस पडलेली दिसून आली. नागरिकांनी घराबाहेर न येणे पसंत केले, तर शहरातील व्यापार्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवले होते.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी अॅक्टीव्ह मेंबरच्या सदस्यांनी तीन दिवसीय मुरूड शहर बंद करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक, व्यापारी, भाजीविक्रेेते व इतर दुकानदारांनी चांंगला प्रतिसाद दिला आहे. यापुढील दोन दिवसही दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे, जेणेकरून कोरोनाचा फैलाव कमी होऊन मुरूड शहरासह तालुका कोरोनामुक्त होईल.
ज्या वेळी दुकाने उघडतील त्यावेळी नागरिकांनी दुकानांत गर्दी करू नये. तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.