पेण ः प्रतिनिधी
कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांसाठी काही वेळेस रुग्णवाहिकाही उपलब्ध होत नाही. तसेच बरे होऊन येणार्या रुग्णांस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्या अनुषंगाने समाजसेवक राजू पिचिका यांनी पेण तहसील कार्यालयास एक रुग्णवाहिका भेट दिली आहे. पेणमध्ये सध्या कोरोनाचे आकडे वाढत आहेत. एकाच वेळी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा अभाव व पेण बाजारातील वाढत्या गर्दीमुळे कोरोना सध्या पेण शहरात थैमान घालत आहे. पॉझिटिव्ह रुग्णास 108 रुग्णवाहिका सेवा देते, मात्र बरे होऊन परत घरी येणार्या रुग्णांस रुग्णवाहिका मिळणे कठीण जाते. हीच गरज ओळखून समाजसेवक राजू पिचिका यांनी स्वखर्चाने एक अद्ययावत 24 तास सेवा असलेली रुग्णवाहिका पेणकरांसाठी उपलब्ध करून दिली. नवीन रुग्णवाहिका आल्याने कोविड रुग्णांस मोठा दिलासा मिळणार आहे. नुकताच पेणच्या तहसीलदार अरुणा जाधव यांच्यामार्फत या रुग्णसेवेचा शुभारंभ पेण तहसीलच्या प्रांगणात करण्यात आला.