Breaking News

आदर्श शिक्षक पुरस्कारात संशयकल्लोळ

खोपोली ः प्रतिनिधी

सन 2020-21साठी प्राथमिक गटातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी खालापूर पंचायत समितीकडे जमा तीन फायलींपैकी जिल्हा परिषदेकडे एकच विशिष्ट फाइल पोहचल्याने निवड प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. खालापूर तालुक्यात 400 प्राथमिक शिक्षक आहेत. दरवर्षी प्राथमिक आणि माध्यमिक गटातून तालुक्यातून दोन शिक्षकांची निवड केली जाते.

जिल्ह्यातून होणार्‍या निवडीच्या बहुमानासाठी शिक्षकांनी कठोर परिश्रम, वर्तणूक, गुणवत्तापूर्ण निकष पूर्ण करणे गरजेचे आहे. जवळपास 75 पानांची फाइलच तयार होत असून ही फाइल पंचायत समितीत जमा करून पुढे जिल्हा परिषदेकडे पाठविली जाते. यंदा खालापुरातून प्राथमिक गटातून तीन शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड व्हावी यासाठी पंचायत समितीकडे दिलेल्या मुदतीत फायली जमा केल्या. तशी पोचदेखील घेतली, परंतु खालापूर पंचायत समितीकडून केवळ एकच फाइल पुढे पाठविण्यात आल्याने निवड प्रक्रियेत तालुका पातळीवर राजकीय हस्तक्षेप होत असल्याची चर्चा आहे, परंतु शिक्षकांवर बारा महिने असलेल्या विविध कामांच्या बोजामुळे आवाज उठविल्यास हा बोजा आणखी वाढण्याच्या भीतीमुळे गुरुजींचा आवाज दबला जात आहे.

निवड प्रक्रियेनुसार पंचायत समितीकडे पुरस्कारासाठी दाखल फाइल जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकार्‍यांकडे पोहचणे आवश्यक आहे, परंतु जमा फायलींपैकी केवळ एकच फाइल जिल्हा परिषद शिक्षण विभागात पोहचल्यामुळे अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.

-राजाराम जाधव, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शिक्षक संघटना, खालापूर

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply