श्रीवर्धन ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात थैमान घातले. वादळामुळे विजेचे खांब, तारा तुटून पडल्या. कांदळगाव ते पाभरे टॉवर लाईन, पाभरे ते श्रीवर्धन हाय टेन्शन लाइनचे काम मालेगाव, ठाणे, कल्याण, पनवेलहून आलेल्या महावितरणच्या स्टाफने चोखपणे केले, परंतु बाहेरून आलेल्या महावितरण कर्मचार्यांतील एकाला खोकला, ताप तसेच कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 27 जूनला त्या कर्मचार्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परिणामी सर्व कर्मचारी काम सोडून आयटीआय इमारतीजवळ जमा झाले. यानंतर पूर्ण स्टाफला रातोरात बस करून पाठवण्यात आले.
अद्याप श्रीवर्धन शहरातील वीजपुरवठा व्यवस्थितरीत्या सुरू झाला नाही. अजून तालुक्यातील ग्रामीण भाग अंधारातच आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. श्रीवर्धन शहरातील ज्या भागांत 50 टक्के वीजपुरवठा सुरू झाला होता, अशा ठिकाणी स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर येऊन तारांची जोडणी करणे, तारा रस्सीने खेचणे आदी कामे करीत महावितरणच्या दोन कर्मचार्यांमध्ये आपल्या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला. बहुतांश ठिकाणी नागरिकांनी वीज पोलसाठी खड्डे खणले. त्यामध्ये पोल उभेदेखील केले. त्याला काँक्रिटचा थरही देण्यात आला. महावितरणचे कर्मचारी फक्त पोलवर चढून वीज जोडणी करीत होते, परंतु आता तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला धावपळ करावी लागणार आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे मटेरियलही येऊन पडले आहे. चार ते पाच मोठे क्रेनही दाखल झाले आहेत, परंतु सदरचे काम करण्यासाठी बाहेरून कर्मचारी आणल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत करणे महावितरण अधिकार्यांसमोर मोठे आव्हान आहे.