Breaking News

वरुणराजाचे पुनरागमन; बळीराजा सुखावला

पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर रायगड जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. त्यामुळे हवेत गारवा आला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या जीवांना हायसे वाटले आहे. विशेष म्हणजे वरुणराजाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला असून, शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी केली होती, मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने लावणीची कामे खोळंबली होती. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भात लावणीच्या कामांनाही सुरवात झाली, मात्र पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी कामे रखडली होती. अखेर गुरुवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. शुक्रवारीही दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे बळीराजा नव्या जोमाने आपल्या शिवारात कामाला लागला आहे.
अतिवृष्टीची शक्यता
रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 3) काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे 4 जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 5, 6 व 7 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त  केली आहे. त्यानुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply